-जानकीदेवी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी केले संविधानाचे वाचन
चिखली (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले, तसेच २६ नोव्हेंबरला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडरावजी घुबे होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे आणि प्राचार्य बबन लांडगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना प्रा. उद्धवराव घुबे यांनी आपल्या भाषणातून संविधानाविषयी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा देशांच्या घटनांचा अभ्यास केला. तसेच भारतासारख्या विशाल देशातील विविध संस्कृती, परंपरा आणि जाती-धर्मांचा विचार करून समाजातील सर्व स्तरांतील, अगदी तळागाळातील माणसालाही न्याय मिळावा, या भूमिकेतून सर्वसमावेशक संविधान देशाला दिले. या संविधानात प्रत्येकाला समान अधिकार देण्याबरोबरच कर्तव्यांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. समता आणि न्याय हे संविधानाचे आधारस्तंभ आहेत. संविधानाचा सन्मान राखण्यासाठी त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून जीवनाची वाटचाल केल्यास देशात शांतता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित होईल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला कसा मिळावा, याविषयी विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व बाबींचा सखोल व सर्वसमावेशक अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीला वागण्याचे आणि जगण्याचे अधिकार दिले. एवढेच नव्हे, तर जगातील विविध धर्मांच्या परंपरा आणि संस्कृतींचा अभ्यास करून सर्वसामान्य माणसाला निर्भयपणे जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची राज्यघटना म्हणजे सर्व धर्मांच्या साराचे प्रतीक असलेला पवित्र ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. बी. तायडे यांनी केले.