-चिखली तहसीलदार विजय सवडे यांची कारवाई; मेरा बुद्रुक येथे महसूल पथकाची धडक
चिखली (राजेंद्र घुबे) : चिखली तालुक्यातील मौजे मेरा बुद्रुक येथे अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर महसूल प्रशासनाने २५ नोव्हेंबर रोजी पकडले. चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरा बुद्रुक येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास अवैध रेतीने भरलेले टिप्पर (क्रमांक MH-14 LL 9135) आढळून आले. सदर टिप्परचा चालक विशाल धारे असल्याची माहिती आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करून टिप्पर ताब्यात घेण्यात आले. पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर टिप्पर अंढेरा पोलीस ठाण्यात अटकाव म्हणून ठेवण्यात आले आहे. तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया करण्यात येत आहेत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय सवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे रेती वाहतूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.