- उच्च न्यायालयाच्या समितीच्या शिफारशी तपासणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले असून, यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी गठित केलेल्या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी ही समिती काम करेल. समितीच्या शिफारशी राज्य सरकारला सादर झाल्यानंतर वेतनवाढीसंदर्भात सरकार निर्णय घेईल.
सह्याद्री अतिथीगृह येथे दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक शेखर मुघाटे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव स्वप्नील खटी आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नव्याने स्थापन होणाऱ्या त्रिसदस्यीय समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश असेल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून दिली जाणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शासन स्तरावरून सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय आणि आर्थिक बाजू स्पष्ट केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाच्या इतर विभागांतील समकक्ष संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा तौलनिक अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या संभाव्य आर्थिक भाराचाही विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
कर्मचाऱ्यांची मागणी काय?
मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना 2006 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी. उच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2025 रोजी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, गेल्या 21 महिन्यांत शासनस्तरावर त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.