-कीर्तन, गायन आणि समाजप्रबोधनातील योगदानाचे स्मरण; भाविकांना महाप्रसादाचे वाटप
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय महंत वैकुंठवासी गुरुवर्य संत भीमसिंह बाबांची पुण्यतिथी मंगळवारी भगवानगडावर भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि गडाचे महंत ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
यावेळी ह.भ.प. बाबासाहेब महाराज बडे (केशवराज संस्थान, वारणी) यांचे कीर्तन झाले. त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘धन्य मी मानीन आपुले संचित’ हा अभंग निरूपणासाठी घेत संत भीमसिंह बाबांच्या जीवनकार्याचा गौरव केला. संत भगवानबाबांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि समाजप्रबोधनाचे कार्य संत भीमसिंह महाराज यांनी समर्थपणे पुढे नेले. गायन, मृदंगवादन आणि कीर्तन या तिन्ही क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान होते. रसाळ वाणीतील कीर्तनातून त्यांनी संतविचार, समता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. इतरांच्या कीर्तनात स्वतः टाळ घेऊन उभे राहण्याची त्यांची विनम्रता वारकरी संप्रदायासाठी आदर्श ठरली. पैठण येथील संतपीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. साधी राहणी, सेवाभाव आणि संतविचारांवरील निष्ठा यांमुळे त्यांचे कार्य आजही वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असल्याचे कीर्तनातून सांगण्यात आले. कीर्तनसेवेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हरिनामाच्या गजरात पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली.