-प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक शुल्क आकारणार; आळंदी नगरपरिषदेची कठोर कारवाई
आळंदी (अर्जुन मेदनकर) : नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करणे आवश्यक आहे. पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे ही सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही काही नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर तसेच मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या बाबीची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत (दि. २०) विशेष तपासणी व कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पाण्याचा अपव्यय करताना आढळून आलेल्या एकूण पाच नागरिकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. तसेच संबंधित नागरिकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात येणार आहे. नगरपरिषद प्रशासनामार्फत पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी यापुढेही नियमित तपासणी करण्यात येणार असून, पाण्याचा अनावश्यक वापर करणाऱ्या नागरिकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर आवश्यकतेनुसारच करावा, नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.