– गोंदिया जिल्ह्यातील वाळूतस्करीचा प्रश्न ऐरणीवर, महालगाव मुरदाडा येथील विचित्र अपघात
– जमावाने टिप्पर पेटवून दिला, ड्रायवर पळून गेला
गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) – गोंदिया जिल्ह्यातील वाळूतस्करी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठली असून, आज (दि.१५) वाळू वाहून नेणार्या टिप्परने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा ट्रॅक्टर त्याच्याखाली घुसला. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसह १ शेतमजूर जागीच ठार झाला असून, ५ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा महसूल प्रशासन वाळूतस्करांना अर्थपूर्ण व्यवहारातून अभय देत असल्यानेच वाळूतस्कर मुजोर झाले आहेत. त्यामुळे ते असे दिवसाढवळ्या लोकांचे जीव घेत आहेत.
वाळूची तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांच्यात हा विचित्र अपघात झाला. जोरात जाणार्या टिप्परने अचानक ब्रेक मारल्याने मागील ट्रॅक्टर हा टिप्परखाली घुसला. अपघात इतका भीषण होता, की ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर एक शेतमजूरही जागीच ठार झाला. ही घटना गोंदिया तालुक्यातील महालगांव मुरदाडा येथे घडली. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरवरील अन्य पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.
प्रशांत धर्मराज आगासे असे चालकाचे नाव आहे. तर गोविंद योगराज आगासे, गुलशन बलीराम कावळे, शैलेश मुलचंद भोयर, विशाल मुन्नालाल नागपुरे, उमेश शंकर आगासे असे गंभीर जखमीचे नाव आहे. सद्या शेतीचा हंगाम सुरु असून पेरणीसाठी शेतकरी लगबग करत आहेत. त्यामुळे शेतीकामासाठी महेश नागपुरे यांचा ट्रॅक्टर मजूर घेऊन जात असतांना महालगांव मुर्दडा गावाजवळ एका वाळूतस्करी करणार्या टिप्पर (ट्रक)ने ओव्हरटेक करत असताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे अचानक भरधाव असलेला टिप्पर थांबल्याने मागून येत असलेल्या ट्रॅक्टर चालकाला काहीच सूचले नाही. त्यामुळे तो सरळ टिप्परखाली घुसला. या भीषण अपघातात ड्रायव्हर व मजूर जागीच ठार झाले तर ५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताची माहिती कळताच लोकांनी मदतीसाठी एकच धावपळ केली. तसेच, संतप्त जमावाने हा टिप्पर आग लावून जाळून टाकला. या घटनेची माहिती कळताच दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिप्परचा चालक पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मृतकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.