-दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार श्वेता महाले यांचा पुढाकार; धार्मिक संस्थांनीही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
चिखली (महेंद्र हिवाळे) : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. दुष्काळ, पावसाची अनिश्चितता आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. उत्पादनात घट झाल्याने आर्थिक संकट वाढले असून, कर्जबाजारीपणा आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी कुटुंबांवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात बळीराजाला मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध कार्यक्रमांवरील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठविणाऱ्या आमदार श्वेता महाले यांनी सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी संस्थांनीही या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली येथील रेणुका माता संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थानने केलेल्या या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळणार असून, इतर संस्था आणि नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
शेतकरी हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. तो सुखी आणि सक्षम असेल, तरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहू शकते. आज शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून आमदार श्वेता महाले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि मदतकार्याला व्यापक स्वरूप मिळावे, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघातील विविध संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांमध्येही मदतीसाठी पुढे येण्याची भावना निर्माण होत आहे.
रेणुका माता संस्थानने दिलेली एक लाख रुपयांची मदत हा या आवाहनाला मिळालेला महत्त्वपूर्ण प्रतिसाद आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. सक्षम घटकांनी पुढाकार घेतल्यास मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. ‘बळीराजा जगला, तरच महाराष्ट्र जगेल!’ या भावनेतून आमदार श्वेता महाले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेला हा प्रयत्न समाजासमोर एक आदर्श ठेवणारा आहे. त्यांच्या आवाहनाला मिळणारा प्रतिसाद भविष्यातील मदतकार्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.