– डॉ. विकास मिसाळ आणि संतोष बोर्डे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तीन वर्षांपासून प्रलंबित वीज वाहिनीचे काम युद्धपातळीवर पूर्ण!
– तलावात पाणी असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रामस्थांची होती हेळसांड; अखेर वीजप्रश्न मार्गी लागल्याने पाणीपुरवठा सुरळीत!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : मिसाळवाडी तलावात भरपूर पाणी असूनही मागील काही महिन्यांपासून बंद असलेला शेळगाव आटोळ (ता. चिखली) गावाचा पाणीपुरवठा अखेर पूर्ववत सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ आणि शेळगाव आटोळचे माजी उपसरपंच संतोष बोर्डे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
शेळगाव आटोळ गावाला मिसाळवाडी तलावातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जाते. मात्र, ही योजना पूर्वी पाच गावांसाठी असल्यामुळे प्रत्येक गावाला सुरळीत पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. हीच गांभीर्य लक्षात घेऊन, डॉ. विकास मिसाळ यांनी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून मंगरूळ, अमोना आणि मिसाळवाडी या गावांना ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.
तसेच, शेळगाव आटोळ आणि पिंपळवाडी या दोन गावांच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी साडेचार कोटी रुपयांची सुधारित योजना आणि सततच्या लोडशेिंगवर मात करण्यासाठी २०२४ तासांच्या स्वतंत्र विद्युत पुरवठा वाहिनीकरिता (२४ तास वीज पुरवठा) १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विद्युत वाहिनीचे सुमारे ९० टक्के काम तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते; परंतु काही किरकोळ कामे बाकी राहिल्याने वीजपुरवठा सुरू होऊ शकला नव्हता. सद्यस्थितीत जुन्या वाहिनीवरून केवळ ६ तास वीज मिळत असल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य बनले होते.
सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी डॉ. विकास मिसाळ आणि संतोष बोर्डे यांनी उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, चिखली) यांना थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने हालचाली करत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले विद्युत वाहिनीचे काम पूर्ण केले. परिणामी, शेळगाव आटोळचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.