युवा नेते शिवाजी शिराळे पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; विशेष ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्याची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शासनामार्फत शेतकरी व ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सवलती, योजना आणि मदतीची माहिती थेट ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात यावी, अशी मागणी युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळाच्या तीव्र पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र, माहितीच्या अभावामुळे अनेक गरजू नागरिकांपर्यंत शासकीय निर्णय, अनुदाने, कर्जसवलत, पीक नुकसानभरपाई, पाणीटंचाई निवारण उपक्रम आणि रोजगाराच्या योजना पोहोचत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिराळे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालयांच्या दर्शनी भागात दुष्काळसंबंधी सर्व योजना आणि सवलतींची यादी लावणे, विशेष ग्रामसभांचे आयोजन करून शासन निर्णयांचे वाचन करणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पिकांचे नुकसान, चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची सोय आणि रोजगाराच्या संधी याबाबतची अधिकृत माहिती थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी १० प्रमुख बाबींवर निवेदनात भर देण्यात आला आहे. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन जनजागृती मोहीम राबवावी, जेणेकरून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय मदतीचा हात पोहोचेल, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.