-लाईटअभावी नागरिकांना वारंवार हेलपाटे; प्रवासखर्च, मजुरीसह वेळेचेही नुकसान, कायमस्वरूपी वीज बॅकअपची मागणी
लोणार (वाजिद खान) : एकीकडे संपूर्ण तालुका भीषण दुष्काळाच्या गर्तेत सापडला असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याची तक्रार समोर आली आहे. लोणार तहसील कार्यालयात वीजपुरवठा खंडित होताच कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज नसल्याचे कारण पुढे करून कामे रखडत असल्याने दुष्काळाच्या काळात नागरिकांना तहसील कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दुष्काळात मदतीऐवजी नागरिकांना हेलपाटे
सध्या लोणार तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, दुष्काळी मदत, विविध दाखले तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेकडून कर्ज काढून किंवा पदरचे पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. मात्र, तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर हक्काचे काम होण्याऐवजी ‘लाईट नाही, कॉम्प्युटर बंद आहे, नंतर या’, असे उत्तर मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. डिजिटल इंडियाच्या काळात महत्त्वाच्या तालुका तहसील कार्यालयात विजेचा पर्यायी बॅकअप (इन्व्हर्टर/जनरेटर) उपलब्ध नसणे किंवा उपलब्ध यंत्रणा नादुरुस्त असणे, याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तासन्तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने संपूर्ण कार्यालयातील कामकाज ठप्प होते. ग्रामीण भागातून भाडे करून आलेल्या नागरिकांना दिवसभर उपाशीपोटी ताटकळत राहावे लागते आणि अखेर संध्याकाळी रिकाम्या हाताने परतावे लागते.
नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास
वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मजुरी बुडते : दुष्काळामुळे आधीच हाताला काम नसताना तहसील कार्यालयातील कामासाठी दिवसभर थांबावे लागल्याने रोजंदारीचे नुकसान होत आहे.
आर्थिक भुर्दंड : दुर्गम भागातून ये-जा करण्याचा प्रवासखर्च, खानावळीचा खर्च तसेच इतर खर्च वाया जात असून एका कामासाठी चार-चार वेळा हेलपाटे मारावे लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वेळेचा अपव्यय : वेळेत दाखले किंवा आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश तसेच शेतकऱ्यांची बँकेशी संबंधित कामे रखडत आहेत. “आम्ही दुष्काळामुळे आधीच अडचणीत आहोत. बसचे भाडे भरून तहसीलमध्ये येतो, तर इथे आल्यावर अधिकारी म्हणतात, लाईट नाही, काम होणार नाही. आमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. प्रशासनाने त्वरित यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.”
— तौफिक कुरेशी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट
प्रशासनाकडे जनतेचा सवाल
दुष्काळाच्या काळात संवेदनशीलता दाखवत नागरिकांची कामे जलदगतीने करणे गरजेचे असताना, केवळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोणार तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन लोणार तहसील कार्यालयाला तातडीने सक्षम वीज बॅकअप उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही शासकीय कामकाज सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.