-नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये; चारा-पाणी टंचाईवरही पूर्वनियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांचे निर्देश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पावसाच्या ताणामुळे तालुक्यात निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची परिस्थिती, शेती पिकांचे नुकसान, संभाव्य चारा व पाणीटंचाई तसेच आगामी काळात निर्माण होणाऱ्या टंचाईच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेडराजा तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील उर्वरित शेती पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पावसाच्या ताणामुळे खरीप हंगामातील विविध पिकांवर परिणाम झाला असून, अनेक भागांत पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे तसेच पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये
पिकांचे पंचनामे करताना प्रत्यक्ष शेतातील नुकसानीची पाहणी करून वस्तुनिष्ठ नोंद करण्यात यावी. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखावी तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश डॉ. देवरे यांनी दिले. पंचनाम्याचे काम केवळ कागदोपत्री न करता प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे करण्यात यावे. महसूल, कृषी तसेच संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून पंचनाम्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात चारा व पशुखाद्याची संभाव्य गरज लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तालुक्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा, पाण्याची उपलब्धता आणि आगामी काळातील संभाव्य गरज यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार ठेवावा. गरज भासल्यास चारा डेपो, चारा छावण्या तसेच पशुखाद्य उपलब्धतेबाबत आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तयार करा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच उपाययोजना करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेल्या गावांची तातडीने यादी तयार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजना निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती तसेच उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर याबाबत पूर्वनियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधित विभागांनी वेळेत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकरी आणि पशुधनाच्या हिताला प्राधान्य
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला कमीत कमी त्रास होईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे डॉ. देवरे यांनी नमूद केले. महसूल, कृषी, पंचायत समिती, नगरपरिषद, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या स्तरावर आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. मात्र, संभाव्य परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता पूर्वतयारी आणि वेळेवर कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
“तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाच्या काळात सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. टंचाई निवारणाच्या कामात कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात,” असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी यावेळी दिले.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, तालुका कृषी अधिकारी भुते, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी भोसले यांच्यासह पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व संबंधित विभागांना दुष्काळ व टंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिल्याचे दिसून येत आहे.