-२५ हजार लोकसंख्येसह २३ गावांचा आरोग्यभार; औषध निर्माता गोपाल मानतकर सेवानिवृत्त होताच अनेक समस्या
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या साखरखेर्डा गावासह जवळपास २३ गावांचा आरोग्यभार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे येथील औषध निर्माता गोपाल मानतकर सेवानिवृत्त झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. गरजेच्या वेळी आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
साखरखेर्डा येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन त्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी या इमारतीचा लोकार्पण सोहळा होईल, अशी अपेक्षा होती. त्याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासनही दिले होते. मात्र, अद्याप लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झालेला नसल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचारासाठी जावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोपाल मानतकर हे अनेक वर्षांपासून औषध निर्माता म्हणून कार्यरत होते. कोणत्या औषधांचा किती साठा आवश्यक आहे, कोणत्या काळात कोणते आजार वाढू शकतात आणि त्यानुसार किती औषधसाठा उपलब्ध ठेवावा, याचे नियोजन त्यांच्याकडे असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण गेल्यानंतर “गोपाल मामा आहेत, औषध मिळणार,” अशी नागरिकांची खात्री असायची. त्यामुळे दररोजची ओपीडी ३००च्या पुढे जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वयोमानानुसार गोपाल मानतकर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आलेल्या कर्मचाऱ्यांना औषध व्यवस्थापनाचा पुरेसा अनुभव नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. गरजेच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची वेळ येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्यक्ष पाहणीत औषधांचा तुटवडा
नागरिकांच्या तक्रारीनंतर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता प्रतिनिधींनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी केंद्रात चार महिला कर्मचारी उपस्थित होत्या. औषधांच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली असता, अनेक महत्त्वाची औषधे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये लहान मुलांसाठी आवश्यक ॲमॉक्स सिरप, कप सिरप, जेंटामायसिन इंजेक्शन, कॅल्शियमच्या गोळ्या, झिंक सल्फेट, व्हिटॅमिन ‘सी’च्या गोळ्या तसेच कॉटनचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती फार्मासिस्ट एम. बी. गवई यांनी दिली.
२५ हजार लोकसंख्येच्या गावातच औषधांचा तुटवडा
साखरखेर्डा हे परिसरातील मोठे गाव असून, गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास २३ गावांचा समावेश आहे. या आरोग्य व्यवस्थेअंतर्गत शिंदी, सवडद, गुंज, राजेगाव, शेंदुर्जन यासह एकूण सहा उपकेंद्रे कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आणि ग्रामीण भागाचा आरोग्यभार असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध नसणे ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
औषधांसाठी रुग्णांना बाहेरील मेडिकलचा आधार
गरीब आणि सर्वसामान्य नागरिक सरकारी आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. डॉक्टरांकडून तपासणी झाल्यानंतर आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळतील, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून ती खरेदी करावी लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः लहान मुलांसाठी लागणारे सिरप, कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ‘सी’सारखी नियमित वापरातील औषधे उपलब्ध नसल्याने पालक व रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे “२५ हजार लोकसंख्येच्या गावात आणि २३ गावांचा आरोग्यभार असलेल्या केंद्रात औषधांचाच दुष्काळ असेल, तर सर्वसामान्यांनी आरोग्यसेवेसाठी कुठे जावे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांचा तुटवडा तातडीने दूर करून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “औषधांचा साठा संपल्यानंतरच प्रशासनाला त्याची माहिती होते का? रुग्णांनी औषधांसाठी आणखी किती दिवस बाहेरील मेडिकलच्या चकरा मारायच्या?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.