-विहिरीवरील नादुरुस्त मोटारपंप काढण्यासाठी जात असताना झाला होता अपघात; २५ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान शिवाजी तुपकर यांचे निधन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गुंज येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर कामासाठी जात असताना निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी धोंडूंबा तुपकर (वय ५९) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुंज ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कर्मचारी आणि शिवाजी तुपकर हे दोघे शेलगाव काकडे परिसरातील कोराडी धरण क्षेत्रात असलेल्या विहिरीवरील नादुरुस्त मोटारपंप काढण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सकाळी मोटारसायकलवरून जात होते. गुंज ते शेलगाव काकडे रस्त्यावरून जात असताना अचानक निलगाय (रोही) आडवी धावत आल्याने मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर दोघांनाही तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही दिवसांनी शिवाजी तुपकर यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २५ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. शिवाजी तुपकर यांच्या पार्थिवावर २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे गुंज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.