-अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कारवाई; पुन्हा मोटारपंप टाकल्यास संबंधित शेतकरी जबाबदार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शिंदी येथील सिंचन तलावातून अनधिकृतपणे पाणीउपसा करण्यासाठी लावण्यात आलेले मोटारपंप ग्रामपंचायतीच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी सकाळी कारवाई करून पाण्याबाहेर काढले. या कारवाईदरम्यान तलावातील पाणी अनधिकृतपणे उपसणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांनी मोटारपंप काढण्यासाठी स्वतःहून सहकार्य केले.
ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन बालाजी कदम यांच्या पथकाने सकाळी सुमारे ९ वाजता सिंचन तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी श्रीराम बेलोडे, तुकाराम शिराळे, अनंता दहातोंडे, गणेश मार्के व लक्ष्मण दहातोंडे यांच्या तलावातील चालू स्थितीतील मोटारपंप, स्टार्टर तसेच वायर पाण्याबाहेर काढण्यात आले. यावर्षी अल निनोच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, तसेच सिंचन तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, या उद्देशाने ग्रामपंचायतीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
पुन्हा मोटारपंप टाकल्यास कारवाईचा इशारा
कारवाईदरम्यान संबंधित शेतकऱ्यांना यापुढे पुन्हा अवैधरित्या मोटारपंप तलावात टाकून पाणीउपसा करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या कारवाईनंतर पुन्हा मोटारपंप, स्टार्टर अथवा वायर तलावात टाकून पाणीउपसा केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामास संबंधित शेतकरी स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. ही कारवाई सिंचन उपविभाग, देऊळगावराजा यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सिंचन तलावातील पाण्याचा वापर यावर्षी पूर्णतः राखीव ठेवण्यात येणार असून, यासाठी ग्रामपंचायतीकडून पुढील काळातही अनधिकृत पाणीउपशावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईवेळी ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे, बालाजी कदम, महावितरणचे श्री. स्वप्नील इंगोले, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल खंडागळे, सिद्धेश्वर वायाळ, गजानन भांड, पुरुषोत्तम खरात, अशोक खरात, गणेश चांदोर, अजय खंडागळे आणि अरुण खंडारे उपस्थित होते.