– देऊळगाव घुबे येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे यंदा तिसरे वर्ष
– सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वारकरी संप्रदायाशी संबंधित उपक्रमांचा समावेश
– शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेत कार्याची घेतली माहिती
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : गणेशोत्सव म्हणजे केवळ वाजत-गाजत मिरवणुका आणि आनंदोत्सव एवढाच अनेकांचा समज असतो; परंतु या उत्सवाला समाजकारणाची जोड कशी दिली जाते, याचे उत्तम उदाहरण बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पाहायला मिळत आहे. येथील देऊळगाव घुबे येथील ‘विघ्नहर्ता गणेश मंडळ’ गेल्या तीन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनोखा सामाजिक व सांस्कृतिक वसा जोपासत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विघ्नहर्ता गणेश मंडळाने केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि गरजू घटकांना फायदेशीर ठरतील असे अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. यंदाच्या तिसऱ्या वर्षातही मंडळाने हे लोकोपयोगी उपक्रम अविरत सुरू ठेवले आहेत.
नुकतेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देऊळगाव घुबे येथे येऊन विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
मंडळाच्या पाठीवर कौतुुकीची थाप देताना रविकांत तुपकर म्हणाले,
“विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायाचे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनीही या मंडळाचा आदर्श घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.”
दर्शनादरम्यान तुपकर यांनी श्री गणरायाच्या चरणी महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यातील बळीराजाच्या समृद्धीसाठी आणि शेतकरी प्रश्नांवर लढा देण्याची ताकद मिळण्यासाठी प्रार्थना केली. तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपला संघर्ष यापुढेही असाच सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण न राहता समाज परिवर्तनाचे व समाजहिताचे प्रभावी माध्यम बनू शकतो, हे देऊळगाव घुबेच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचे हे प्रेरणादायी कार्य संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे.