-पंचक्रोशीतील पाच गावांना एकत्र आणण्याचा संस्थानचा संकल्प; १५ सप्टेंबरला महाप्रसादाचे आयोजन, भाविकांमध्ये उत्साह
चिखली (महेंद्र हिवाळे) : अंत्रीकोळी व पंचक्रोशीच्या इतिहासात प्रथमच श्री संत गजानन महाराज संस्थान, अंत्रीकोळी यांच्या वतीने भव्य-दिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या ऋषीपंचमी पर्वाचे औचित्य साधून प्रथमच महाभोजन (भंडारा) कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अंत्रीकोळी गावासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे.
मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या पहिल्या महाभोजन सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, “आजवर आम्ही लहान स्वरूपात पूजा-अर्चा करत होतो; मात्र यंदा प्रथमच पंचक्रोशीतील पाचही गावांना एकत्र आणून असा मोठा महाप्रसाद करण्याचा संकल्प केला आहे. श्रींच्या कृपेने हा सोहळा दरवर्षी असाच मोठा होत जाईल.” या पहिल्या-वहिल्या महाभोजन सोहळ्यामुळे अंत्रीकोळी, वाघापूर, साकेगाव, खोर आणि माळशेंबा या पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक पहिल्या महाभोजन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि नव्या परंपरेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.