-महोत्सवाला तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे : जितु निकाळजे
बुलढाणा (महेंद्र हिवाळे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या वतीने जिल्हास्तरीय ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा (दक्षिण व उत्तर) आणि वंचित बहुजन आघाडी, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, मा. आयुष्यमानी अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती. त्यांच्यासोबत पूज्य भन्ते संघ, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौकापासून प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत घोडेस्वार, मोटारसायकलस्वार, चित्ररथ, देखावे, आखाडे, लेझीम पथक, समता सैनिक दल, भिक्खू संघ, श्रामणेर संघ, उपासक-उपासिका तसेच महिला मंडळ हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मिरवणुकीनंतर सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), डी.एड. कॉलेजचे मैदान, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. जाहीर सभेपूर्वी प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे चिखली तालुका सचिव जितु निकाळजे यांनी केले आहे.