-“ग्रामीण भागातील पत्रकारांनी सामान्य व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका बजावली” — डॉ. निलेश गावंडे
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : ग्रामीण भागातील पत्रकार ज्यावेळी हातात लेखणी घेतो, त्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. त्यातून सामान्य व्यक्तीला न्याय कसा देता येईल, यासाठी तो प्रयत्नशील असतो. तोच खरा पत्रकार आहे. कै. भोजराज गाडेकर यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केले. तसेच त्यांनी स्वतः ‘विदर्भ न्याय’ हे साप्ताहिक सुरू करून सर्वसामान्य व्यक्तीचा आवाज बुलंद केला, असे विचार कै. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी व्यक्त केले.
१२ सप्टेंबर रोजी श्री पलसिद्ध महास्वामी मठात पत्र तपस्वी कै. भोजराज गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, कविवर्य अजीम नवाज राही, साहित्यिक किसनराव पिसे, प्रवीण गिते, प्रा. दिलीप नाईकवाड, ठाणेदार युवराज रबडे, पत्रकार सुषमा राऊत, राजाभाऊ दवणे, राजेश तोटे, भाजपचे उल्हास देशपांडे, माजी सभापती सुनील जगताप, माजी सरपंच अमित जाधव, माजी उपसरपंच सय्यद रफीक, अॅड. निशिकांत राजे जाधव तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘पत्र तपस्वी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अजीम राही यांनी आपल्या शैलीदार भाषणातून कै. भोजराज गाडेकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी पत्रकार सुषमा राऊत, राजाभाऊ दवणे, राजेश तोटे आणि मधुकर मोहिते यांची उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संतोष गाडेकर, सरपंच गजानन देशमुख आणि सवडद येथील नागरिकांनी केले होते.