-शेतकरी योद्धा कृती समितीचा शासनाला थेट सवाल; “कागदावरील आकडे नकोत, शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि वाळलेली पिके पाहा!”
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. मात्र, बुलढाणा जिल्ह्याचा या यादीत समावेश न केल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी योद्धा कृती समितीने शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीत येऊ शकतात, मग बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात नेमका कोणता वेगळा पाऊस पडला? हा प्रश्न आता शासनाला विचारण्याची वेळ आली आहे. जालना जिल्ह्याची सीमा बुलढाणा जिल्ह्याला लागून आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील सीमेलगतचा शेतकरी यांच्यामध्ये काही ठिकाणी अंतर अगदी काही फुटांचे किंवा काहीशे मीटरचे असू शकते. जमीन तीच, आकाश तेच, ढग तेच आणि पावसाची परिस्थितीही जवळपास समान. मग केवळ प्रशासकीय सीमा बदलली म्हणून एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ नाही, असा निर्णय कसा काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्याची सीमारेषा कागदावर असते; शेतकऱ्याच्या शेतातील तहान मात्र खरी असते!
आज बुलढाण्यातील शेतकरी आकाशाकडे पाहतोय, पिकांकडे पाहतोय, कर्जाकडे पाहतोय आणि घरातील लेकरांकडे पाहतोय. परंतु शासनाला हे विदारक चित्र दिसत नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतात उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाळत आहे. बियाणे घेतले, खत घेतले, औषधे घेतली, मजुरी केली, कर्ज काढले, दिवसरात्र शेतात राबला आणि शेवटी पावसाने पाठ फिरवली. आता त्याच्याकडे ना पीक उरले, ना उत्पन्नाची खात्री, ना पुढचा हंगाम उभा करण्याची ताकद. अशा वेळी शासनाच्या यादीत त्याला दुष्काळग्रस्त म्हणूनही जागा मिळत नसेल, तर शेतकऱ्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे? सरकारने एकदा शेतकऱ्याच्या घरात येऊन पाहावे! शेतकऱ्याच्या घरात धान्याची पोती नाहीत; कर्जाच्या पावत्या आहेत. शेतात हिरवेगार पीक नाही; वाळलेली पिके आहेत. डोळ्यांत भविष्याची स्वप्ने नाहीत; उद्याची चिंता आहे. आणि तरीही सरकारी कागद सांगतो की बुलढाणा दुष्काळसदृश यादीत नाही. मग हा कागद खरा की शेतकऱ्याच्या शेताची अवस्था खरी? शेतकरी योद्धा कृती समिती शासनाला स्पष्टपणे सांगू इच्छिते की, बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थितीची तातडीने पाहणी करावी, दुष्काळसदृश परिस्थितीचा स्वतंत्र आढावा घ्यावा आणि जिल्ह्याचा यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा दिलासा द्यावा.
आम्हाला सरकारशी संघर्ष करायचा नाही; पण सरकारने शेतकऱ्याला संघर्ष करण्यास भाग पाडू नये!
शेतकरी आजही सरकारकडे आशेने पाहतोय. कारण त्याला माहिती आहे की, शेवटी संकटाच्या काळात सरकारच आधार देऊ शकते. जर सरकारने त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहिले नाहीत, त्याच्या वाळलेल्या पिकाचा आक्रोश ऐकला नाही आणि त्याच्या न्यायाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेऊन लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.