-राऊतवाडीतील संत गजानन महाराज मंदिरात कार्यक्रम; नवनियुक्त अशासकीय सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान
चिखली (राजेंद्र घुबे) : छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या नवनियुक्त अशासकीय सदस्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात स्थानिक राऊतवाडी येथील संत गजानन महाराज मंदिरात संपन्न झाला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे हभप. प्रकाश जवंजाळ महाराज होते. चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंदू रक्षक धर्म परिषदेच्या अध्यक्षा हभप. रेणुकाताई जाधव उपस्थित होत्या. यावेळी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा वैशालीताई खेडेकर, महिला व बालकल्याण सभापती सुषमाताई चव्हाण, बुलढाणा तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष पवार महाराज, हिंदू रक्षक धर्म परिषदेचे जिल्हा सचिव राजेश मुळे, शाहीर तथा राज्यशाहीर कलावंत सज्जनसिंग राजपूत, नगरसेविका गावंडेताई, पत्रकार व लेखक-साहित्यिक विनोद चव्हाण, तेजराव गायकवाड, जनार्दन जाधव आणि मनोज खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समितीचे नवनियुक्त अशासकीय सदस्य हभप. दामू अण्णा शिंगणे, पंजाबराव देशमुख, गजानन जाधव, प्राध्यापक कमलेश खिल्लारे, प्राध्यापक भगत आणि शाहीर प्रमोद दांडगे यांचा माऊली सेवा समितीचे सदस्य गोपाल जाधव तसेच माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध कला क्षेत्रातील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतांच्या विचारांची समाजाला गरज : सुषमाताई चव्हाण
यावेळी सुषमाताई चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संसार करत असताना संतांचा सत्संग महत्त्वाचा आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांशी जोडले गेल्यास प्रपंचातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते, असे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाच्या मार्गदर्शक हभप. रेणुकाताई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, जीवनातील कलेचे महत्त्व सर्वांनाच समजते असे नाही. ज्यांच्या अंगी कला आहे, त्यांनी ती समाजाच्या उपयोगी आणून समाजप्रबोधन केले पाहिजे. बुलढाणा जिल्हा राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळखला जातो. राजमाता जिजाऊंच्या विचारांची गीते, पोवाडे आणि संस्कृती जोपासत सर्व माता-भगिनींनी पुढे आले पाहिजे. वारकरी संप्रदायाबरोबरच गोरोबा, चोखोबा, ज्ञानोबा आणि संत मुक्ताबाई यांचे विचार घराघरात पोहोचविण्याची आज गरज आहे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून योगदान द्यावे : पंडितराव देशमुख
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्याची शाहिरी कला, वारकरी संप्रदाय, भक्तिगीते आणि भावगीतांची परंपरा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी कलाकारांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्येक कला क्षेत्रातील कलावंतांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या परिवारासह समाजातील विविध घटकांना सहकार्य करून त्यांना सुखी ठेवण्याचे कार्य प्रेरणादायी आहे. कलावंतांना काही अडचणी आल्यास आम्हीही सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहून मदत करण्यास तयार आहोत, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
कलाकारांना योग्य न्याय देण्याचे समिती सदस्यांना आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप. प्रकाश जवंजाळ यांनी अध्यक्षीय भाषणातून नवनिर्वाचित मानधन समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या माध्यमातून सामाजिक कार्य घडत राहणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या संस्कृतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व प्रकारच्या कलावंतांना निष्पक्षपणे न्याय देण्याचे काम समितीच्या सदस्यांनी केले पाहिजे. बुलढाणा जिल्ह्याला कला व संस्कृतीच्या जुन्या परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा कलेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे मानधन योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच शासन दरबारी काही नवीन समस्या असतील, तर त्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यासाठी या समितीच्या माध्यमातून आणखी काय करता येईल, यासाठी सांस्कृतिक मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सहकार्य करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवू, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाभरातून आलेल्या कलाकारांची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच भजनी मंडळांना नवीन अर्ज भरून शासन दरबारी पाठविण्याबाबतही माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मानधन समितीच्या नवनियुक्त अशासकीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळराव जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील भाऊ वायाळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. शाहीर गजानन दादा जाधव यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले. सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच गोपाल जाधव मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले.