-शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार; शासनाकडून अधिसूचना जारी
मुंबई/बुलढाणा(बाळू वानखेडे) : राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांबरोबरच आता मुदत संपलेल्या १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवरही प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना आज, ८ सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ५१४ ग्रामपंचायतींचा समावेश असून, मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती आहेत.
राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. सदर ग्रामपंचायतींवर शासनाकडून विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांना मात्र कोणतेही आर्थिक अधिकार देण्यात आले नव्हते. एकंदरीत, सदर प्रशासकांची अवस्था ‘ओसाड गावची पाटीलकी’ अशी झाली होती. सरपंचांच्या प्रशासक म्हणून नियुक्तीला सहा महिने पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्त्याही आपोआप रद्द झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या १० ते १५ दिवसांपासून सदर ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे सुरू होता.
खर्चाचे कोणतेही अधिकार नसल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगाच्या खात्यात लाखो रुपये नुसतेच पडून आहेत, तर काही ग्रामपंचायतींच्या झालेल्या कामांची बिलेही प्रलंबित आहेत. याबाबत विविध संघटनांनी शासनाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. काहींनी सरपंचांना मुदतवाढ देऊन खर्चाचे अधिकार देण्याची मागणीही लावून धरली होती. अखेर शासनाने सदर ग्रामपंचायतींवर आता प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची अधिसूचना काढली आहे. यामध्ये विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी आरोग्य तसेच कोणत्याही अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबतचे आदेश सहसचिव वर्षा भरोसे यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज, ८ सप्टेंबर रोजी दिले आहेत. सदर प्रशासकाची नियुक्ती राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत गृहीत धरण्यात येईल, असे सदर अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत, राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर गेल्या चार वर्षांपासून अधिकाऱ्यांचे प्रशासकराज सुरू असताना, आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरही शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार असल्याने निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे मात्र जनतेचे लक्ष लागले आहे.