-भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप; इंद्रायणी नदी घाटावर प्रवेशबंदीमुळे नाराजी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड हरिनाम गजरात भाविकांनी दर्शन रांगा लावत श्रींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे पान दरवाजा मार्ग बंद झाल्याने भाविकांना गांधी रामवाड्यातील विकसित दर्शन बारीतून मंदिरात प्रवेश देण्यात आला.
इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने नदी घाटावर जाण्यास बंदी घातली होती. अडथळे व दोऱ्या लावून घाट परिसरात प्रवेश रोखण्यात आला. त्यामुळे नेहमी भाविकांनी गजबजलेला इंद्रायणी नदी घाट यंदा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदीचे पवित्र जल आचमन करण्याची परंपरा जोपासता न आल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. आपत्ती व्यवस्थापन पथक, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक आणि जीव रक्षकांनी घाट परिसरात दक्षता घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली. मंदिरातील परंपरेनुसार ब्रह्मवृंदांच्या हस्ते श्रींची पूजा, आरती, दूधआरती आणि फराळाच्या महानैवेद्याचा धार्मिक विधी पार पडला. एकादशीनिमित्त श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. प्रदक्षिणा मार्गावर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. हरिपाठावर आधारित कीर्तन सेवेचा प्रारंभ अवधूत चक्रांकित महाराज यांच्या परिवारातर्फे करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात आळंदी संस्थानचे मानकरी, पुजारी, सेवक, ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाविकांना कमी वेळेत सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने प्रभावी नियोजन केले होते. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच मंदिरातील सुरक्षा रक्षक व सेवकांनी दर्शन बारी आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन यशस्वीपणे सांभाळले.
आळंदी देवस्थान, विविध सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या वतीने भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात भजन सेवा पार पडली, तर माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील यांनी भाविकांना फराळ महाप्रसादाचे वाटप केले. श्री हजेरी मारुती आरती ग्रुपतर्फे हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, पसायदान आणि हरिनाम गजराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी अनवाणी पायाने नगरप्रदक्षिणा करत भक्तीभाव व्यक्त केला. विकसित प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांची प्रदक्षिणा अधिक सुखकर झाली. मात्र, भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर परत येईपर्यंत हरिपाठावर आधारित कीर्तन सेवेची परंपरा अवधूत चक्रांकित महाराज यांच्या परिवारातर्फे सुरू राहणार आहे. यावेळी आळंदी स्वकाम सेवा मंडळाने आषाढी यात्रा निमित्त स्वच्छता अभियान राबविले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेची शपथ देत मार्गदर्शन केले. या सेवाकार्यात स्वकाम सेवा मंडळ, आळंदी देवस्थानचे सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच विविध विभागांनी विशेष सहकार्य केले.