-आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची वाढलेली पातळी आणि वेगवान प्रवाह लक्षात घेऊन प्रशासनाचा इशारा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ निमित्त आळंदी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. सध्या इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असून प्रवाहही वेगवान आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी भाविक, नागरिक आणि वारकरी बांधवांनी इंद्रायणी नदीपात्रात स्नानासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी उतरू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी केले आहे.
भाविकांनी नदीकाठावरील सुरक्षा सूचना, बॅरिकेडिंग तसेच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्रात जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, कारण सध्याची परिस्थिती धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.