– अंढेरा वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंगे म्हणतात, ‘कलेक्टर डिक्लेअर सुटी होती, म्हणून गैरहजर’!
चिखली (एकनाथ माळेकर) – स्थानिक अंढेरा येथे ग्रामीण भागातील महत्वाचे म्हणून ओळखले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.२६ ऑगस्टला दुपारी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल रिंगे हे गैरहजर असल्याने जखमी रुग्णांवर आरोग्य साहाय्यिका यांच्याकडून उपचार करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी बेजबाबदार असणारे वैद्यकीय अधिकारी यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर असे, की दिनांक २६ ऑगस्टरोजी शेतकरीवर्गाचा महत्वाचा पोळा सण असल्याने तो साजरा करण्यासाठी शेतातून घराकडे येत असताना, दुपारी ४ वाजता ज्ञानेश्वर सानप व शिवाजी तेजनकर हे दोघे गणेश सानप यांच्या पोल्ट्री फार्मजवळ मोटारसायकल गाडीवरुन पडल्याने दोघांनाही डोक्याला, हात, पायाला गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्यांना तत्काळ अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु येथील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रिंगे हे गैरहजर असल्याने या जखमी रुग्णांवर येथे कार्यरत असणार्या आरोग्य साहाय्यिका सुषमा जाधव व जयश्री इंगळे यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याविना उपचार करत, जखमींना गंभीर दुखापत असल्याने शिवाजी तेजनकर यांना चिखली येथे तर ज्ञानेश्वर सानप यांना देऊळगाव मही येथे पाठविण्यात आले. परंतु येथील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जमलेल्या संतप्त जमावाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असताना अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी हे चोवीस तास हजर असायला पाहिजेत. परंतु, ते मुख्यालयी राहात नसल्याच्या ग्रामस्थांतून तक्रारी कानावर येत आहेत. तसेच पोळा हा शेतकर्यांचा सण असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास येथील वैद्यकीय अधिकारी जातीने हजर असायला पाहिजेत. असे असताना ते गैरहजर असल्याने त्यांची रुग्णाप्रती उदासिनता दिसून आली. तसेच यापूर्वीही गैरहजर असल्याने सेवानगर येथील वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले होते. येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी नेहमीच का गैरहजर असतात? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे सहाजिक आहे. यावेळी मधुकर सानप, ज्ञानेश्वर जायभाये, गणेश सानप, नितीन नागरे, रवि सानप, ऋषी तेजनकर, सुनिल सानप, सचिन वाघ, अन्वर भाईसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
—
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीच अंढेरा आरोग्य केंद्रावर योग्य ते उपचार करावेत!
अंढेरा येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, येथे अंढेरा गावांसह परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु नेहमीच रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने व रुग्णांची हेळसांड होत असल्याने संपूर्ण जिल्हभर चर्चेत असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आता तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीच उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबधित प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांच्याशी संपर्क साधला असता, कामचुकार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर , योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘अंढेरा येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांना फोन वरुन विचारणा केली असता, २६ ऑगस्टला कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असल्याने मला सुट्टी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली.
‘अंढेरा येथील घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने वैद्यकीय अधिकारी हे नेहमीच हजर असायला पाहिजेत. गैरहजर व कामचुकार असणारे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल!
– डॉ.प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा
——————