-पुनर्वसन, मोबदला आणि गावठाण प्रश्नांवर प्रशासनाची प्रत्यक्ष पाहणी; धरणग्रस्तांना दिले लवकर तोडग्याचे आश्वासन
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाने पुढाकार घेत अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी बुधवारी भागवत एरंडगाव, नवीन दहिफळ व लाखेफळ परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, हक्काचे प्लॉट तसेच गावठाणाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धरणग्रस्तांच्या तक्रारी कायदेशीर बाबी तपासून व प्रशासकीय समन्वयातून लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन हिंगे यांनी दिले. प्रशासनाने थेट गावात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने धरणग्रस्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या दौऱ्यात धरणग्रस्त कृती समितीचे प्रमुख मच्छिंद्र आर्ले, काकासाहेब भुकेले, संदीप बेळगे, राजेंद्र उंदरे, दत्तात्रय आगळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर सनदशीर पद्धतीने मांडल्या. दरम्यान, लाखेफळ गावठाण प्रश्नासंदर्भात सरपंच संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष शरद सोनवणे, सुरेश गजभिव, अशोक आवारे व नवनाथ डोईफोडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले. यावेळी लाखेफळ गावठाणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत हिंगे यांनी तहसीलदार आकाश दहाडदे यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी एरंडगावचे सरपंच गोकुळ भागवत, चेअरमन जगन्नाथ भागवत, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गुरुजी भागवत, जनार्दन भागवत, मार्केट कमिटीचे संचालक अशोकराव धस, उमेश धस, दिलीप भागवत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
