– मौजे भरोसा येथील घटना; रस्ता वाद आणि प्रशासकीय अनास्थेमुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका!
चिखली (अंकुश पाटील) : आसमानी आणि सुलतानी संकटांशी मुकाबला करणाऱ्या बळीराजाला आता प्रशासकीय अनास्थेचा मोठा फटका सोसावा लागत आहे. चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे अरुंद पांधण रस्ता आणि अंतर्गत वादामुळे मक्याने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याची दुर्घटना २२ मे रोजी घडली. या अपघातात संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासकीय रस्ते विकास दाव्यांचे धिंडवडे निघाल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी अरुण तेजराव थुटे यांच्या शेतातील मका घेऊन ट्रॅक्टर (क्रमांक MH 28 CC 4321) भरोसा ते आंचरवाडी रस्त्याला लागून असलेल्या गट नंबर ३३३ च्या पश्चिम दिशेकडील पांधन रस्त्यावरून येत होता. हा ट्रॅक्टर उत्तरेकडील आंचरवाडी मुख्य रस्त्यावर चढत असताना अचानक ट्रॉली पलटी झाली. या अपघातात ट्रॅक्टरमधील मका रस्त्याशेजारी सांडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनास्थळी उपस्थित पंच आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील उत्तर दिशेची वहिवाट बंद करण्यात आली आहे. गट नंबर १३३ चे अंबादास थुटे यांनी वहिवाटीचा रस्ता बंद केल्यामुळे चालकाला पश्चिम दिशेकडील अरुंद व बिकट रस्त्यावरून ट्रॅक्टर काढावा लागला. हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने चढणावर चालकाचा ताबा सुटला आणि मक्याने भरलेली ट्रॉली उलटली.
शासकीय दाव्यांचा फोलपणा उघड! एकीकडे शासन ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याचा मोठा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. भरोसा येथील घटनेने प्रशासनाच्या ‘रस्ते विकासा’च्या दाव्यांमधील फोलपणा चव्हाट्यावर आणला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी उद्धव थुटे, मल्लू हटकर, विशाल थुटे, सागर कवळे, अमोल थुटे आणि नंदकिशोर थुटे यांच्यासह अनेक स्थानिक शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी आणि परिसरातील पांधन रस्त्यांचे प्रश्न कायमचे मिटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.