-दोषींवर कठोर कारवाई व पत्रकारावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
लोणार (वाजिद खान) : सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड-राहेरी येथील वाळू घाटावर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर वाळू वाहतूकदार, कंत्राटदार व त्यांच्या साथीदारांनी १९ मे रोजी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने २२ मे रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार रामदास कहाळे हे वाळू घाटावरील घडामोडींचे लाईव्ह चित्रीकरण करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र या प्रकरणात पीडित पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करावी तसेच पत्रकार रामदास कहाळे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी लोणार तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर डॉ. अनिल मापारी, रेहमान भाई, सचिन गोलेच्छा, गोपाल तोष्णीवाल, उमेश कुटे, राहुल सरदार, श्याम सोनुने, पवन शर्मा, शेख समद, विठ्ठल घायाळ, किशोर मोरे, शेख यासिन, सुनील वर्मा, अनिल वायाळ, अशोक इंगळे, संदीप मापारी, वाजीद खान यांच्यासह तालुक्यातील पत्रकारांच्या सह्या आहेत. निवेदनात तहसीलदार अजीत दिवटे आणि किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दोषींवर कारवाई करण्याऐवजी पत्रकारावरच गुन्हे दाखल करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. “या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अनिल मापारी (मराठी पत्रकार संघ) यांनी केली आहे.