– मोठ्या रक्तस्रावानंतर डॉक्टरांची तत्परता; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःलाच गंभीर इजा करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील लोटस हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने काही काळ त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. मात्र डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःला गंभीर इजा केल्याची चर्चा परिसरात पसरली असून या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भूलतज्ञ डॉ. सचिन लांडगे, डॉ. हर्षवर्धन, डॉ. आदित्य दमानी आणि डॉ. गोविंद कासट यांच्या डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. महंत आदिनाथ महाराज यांचे हजारो भाविक असल्याने त्यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेकांनी अहिल्यानगरकडे धाव घेतली. आमदार मोनिका राजळे आणि आमदार संग्राम जगताप यांनीही हॉस्पिटलमध्ये भेट देऊन डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता हॉस्पिटल प्रशासन तसेच महाराजांच्या अनुयायांकडून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून महाराजांची प्रकृती समाधानकारक आहे. पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना किमान आठ दिवस विश्रांतीची आवश्यकता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतः संदेश देत “माझी तब्येत व्यवस्थित आहे, कोणीही काळजी करू नये. मी लवकरच गडावर परत येणार आहे,” असे सांगितले आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यासह परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने भाविकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.