-दुष्काळी पट्ट्यातील पाण्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा ग्रामीण आवाज बुलंद
बोधेगाव प्रतिनिधी (बाळासाहेब खेडकर) : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. ०१ योजनेअंतर्गत वरूर–आखेगावसह १३ गावांतील बंधारे, शेततळे व गावतलाव भरून मिळावेत, यासाठी या गावांतील नागरिकांचे शिष्टमंडळ लवकरच पाटबंधारे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव काकडे यांनी दिली.
रविवारी (दि. १९) शेवगाव येथे वरूर–आखेगावसह १३ गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक सकाहारी भापकर होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲड. शिवाजीराव काकडे, रंगनाथ ढाकणे, महादेव जवरे, लक्ष्मणराव गवळी, बंडूभाऊ बोडखे, तबाजी बोडखे, बाळासाहेब काटे, सोमनाथ तेलोरे, गणेश धावणे, आदिनाथ धावणे, राजेंद्र फलके, गोरक्ष भोसले, डॉ. हेमंत काटे, नामदेव ढाकणे, नवनाथ ढाकणे, विश्वास ढाकणे, नवनाथ शिरसाठ, लहू जायभाये, शेषराव टेकाळे, अनिल लांडे, बन्सी बोडखे, मिठू जायभाये, रामनाथ भालेराव, भीमसेन गिरमकर, श्रीरंग हुलजुते, गोरक्ष वावरे, डॉ. अंकुश दराडे, ज्ञानदेव वीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजीराव काकडे म्हणाले, “२०१९ पासून या योजनेतून १३ गावांतील बंधारे, गावतलाव व शेततळे भरून मिळावेत, यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. या प्रयत्नांमुळे योजना शासनाकडून मंजूर करून घेण्यात यश आले. आता प्रत्यक्ष कामाला गती मिळावी व आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाटबंधारे मंत्री महोदयांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली जाणार आहे.”
या योजनेमुळे दुष्काळग्रस्त गावांना न्याय मिळून शेती बागायती होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
“सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या या गावांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आम्ही काही काळ थांबलो होतो; मात्र १३ गावांतील नागरिकांच्या आग्रहामुळे पुन्हा एकत्र येत हा लढा उभा करत आहोत. काम पूर्ण होईपर्यंत पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने हा संघर्ष यशस्वी करायचा आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
“ताजनापूरच्या या जललढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून १३ गावांतील महिलाही सक्रिय सहभाग घेणार आहेत.”
— मीनाताई डावरे, खरडगाव
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, लहू जायभाये, ज्ञानदेव वीर, मारुती ढाकणे, भाऊसाहेब सातपुते यांनी आपली मते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गवळी यांनी केले, तर कृष्णा ब्राह्मणे यांनी आभार मानले.
शेवगाव येथे वरूर–आखेगावसह १३ गावांतील प्रमुख शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलताना शिवाजीराव काकडे यांच्यासोबत हर्षदा काकडे व उपस्थित पदाधिकारी व शेतकरी.