-आमदार सिद्धार्थ खरात यांचे प्रभावी प्रचार नियोजन; महापालिका निवडणुकीत उबाठाचे ६ नगरसेवक विजयी
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखडे) : कधी ऑटोने, तर कधी पायाला भिंगरी बांधून अविरत फिरत मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला पूर्णतः झोकून दिले. त्यांच्या अथक मेहनतीचे फळ म्हणून काल पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमदार खरात यांनी प्रचार केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १० पैकी ६ उमेदवार विजयी झाले आहेत. या यशामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांचा सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची मतमोजणी काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या १० उमेदवारांसाठी जोमाने प्रचार केला.
प्रचारादरम्यान मिळेल ते वाहन वापरत, कधी ऑटोने तर अनेक वेळा पायी चालत आमदार खरात यांनी अख्खे वार्ड पिंजून काढले. जाहीर सभा, पदयात्रा आणि घरोघरी जाऊन प्रचार करत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्य, तसेच पक्षात पडलेल्या फूटीमागील वास्तव मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले. त्यांच्या काटेकोर आणि नियोजनबद्ध प्रचाराचे सकारात्मक परिणाम निवडणूक निकालात स्पष्टपणे दिसून आले. या प्रचाराचा फायदा घेत विक्रोळी पार्क साईट वार्ड क्रमांक १२४ मधून सुनील मोरे, विक्रोळी पार्क साईट वार्ड क्रमांक १२३ मधून सकीना शेख, कांदिवली क्रांतीनगर वार्ड क्रमांक ३९ मधून पुष्पाताई कळंबे, कांदिवली दामू नगर वार्ड क्रमांक २६ मधून धर्मेंद्र काळे, गोरेगाव वार्ड क्रमांक ५४ मधून अंकित सुनील प्रभू तसेच वाकोला वार्ड क्रमांक ८९ मधून गितेश विनायक राऊत हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विशेषतः दामू नगर, जयभीम नगर, गौतम नगर, लहुगड, क्रांती नगर, बहुजन हिताय नगर आदी भागांत आमदार खरात यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. स्टार प्रचारक म्हणून आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही आमदार खरात यांच्या शिस्तबद्ध नियोजनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशोर गारोळे निवडून आले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्यांच्या नियोजनातून पक्षाला भरीव यश मिळेल, असा ठाम विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.