– मेटे यांच्या अस्थिकलशाची बीड जिल्ह्यात निघणार यात्रा
बीड (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत नानाविध शंका-कुशंका वर्तविल्या जात असताना, या अपघातप्रकरणी त्यांच्या वाहनचालकाला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होईल की नाही, याबाबत सर्वसामान्यांना शंका वाटू लागली आहे. दुसरीकडे, शिवसंग्राम संघटना आणि भारतीय संग्राम परिषद या पक्षाचे नेतृत्व मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी करावे, असा ठराव दोन्ही संघटनांच्या कार्यकारिणी बैठकीत पारित करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. मेटे या दोन्ही पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसंग्राम पक्ष हा भाजपचा सहयोगी पक्ष राहिलेला आहे. राज्यपाल नियुक्त जागांवर आमदारकी देण्याचे आश्वासन भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना दिले होते. डॉ. ज्योतीताई मेटे यांना आमदारकी देऊन भाजपने आपला शब्द पाळावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत विनायक मेटे यांचा अस्थी कलश संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. विनायक मेटे यांच्या अस्थिकलशाची यात्रा संपूर्ण बीड जिल्ह्यात जाणार असून, आजपासून या यात्रेला सुरुवात होईल. जिल्ह्यातील सर्व तालुके, महत्त्वाची शहरे आणि मोठ्या गावच्या ठिकाणी त्यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.
कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलू नये!
विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी मुख्यमंत्र्याच्या आदेशावरून जलदगतीने करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रदेश कार्यकारणी किंवा डॉ. ज्योतीताई मेटे यांच्याशी सल्ला मसलत करूनच आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी, अशी विनंती शिवसंग्रामच्यावतीने राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.
शिक्रापूर पाठलागप्रकरणी गैरसमजातून आरोप
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, तीन ऑगस्टरोजी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी आणि त्याच्या मालकाला काल रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान गाडी मालकाने महत्त्वपूर्ण अशी माहिती पोलिसांना दिली आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने घाईगडबडीने जात होतो, तसेच आपण मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला नसून, तीन ऑगस्टचा पाठलाग केवळ गैरसमजातून झाला आहे, असे गाडी मालक संदीप वीर यांनी जबाबा म्हटले आहे, अशी माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.
—————-