-भारतीय शिल्पकलेतील तेजस्वी युगाचा अंत; कला विश्वात शोककळा
नवी दिल्ली (अवेश तिवारी) : भारताच्या इतिहासाला, संस्कृतीला आणि राष्ट्रीय अस्मितेला कलात्मक रूप देणारे ज्येष्ठ शिल्पकार राम वांजी सुतार यांचे बुधवारी रात्री नोएडा येथील निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. वयोपरत्वे आजारामुळे ते काही काळ उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात एक मोठे युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
राम वांजी सुतार हे जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार म्हणून जगभर ओळखले जातात. या भव्य पुतळ्याने भारताची एकता, ताकद आणि आत्मविश्वास जागतिक पातळीवर अधोरेखित केला. दगड, धातू आणि कांस्यातून इतिहासाला जिवंत करणारी त्यांची कला ही त्यांच्या आयुष्याची खरी ओळख ठरली.
मूळचे सुतार समाजातील असलेले राम वांजी सुतार हे पारंपरिक हस्तकलेच्या वारशातून पुढे आलेले कलाकार होते. कष्ट, शिस्त आणि कौशल्य ही सुतार समाजाची ओळख त्यांनी आपल्या कलेतून जागतिक स्तरावर पोहोचवली. त्यांच्या यशामुळे सुतार समाजाच्या पारंपरिक कारागिरीला नव्या पिढीसमोर नवी प्रेरणा मिळाली असून, समाजातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम वांजी सुतार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सुतार यांना असे कलाकार म्हणून गौरविले की ज्यांच्या कलाकृतींनी भारताचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्राभिमान कायमस्वरूपी आकारात साकारला. पंतप्रधानांनी त्यांच्या सोबतचे काही क्षणचित्रेही शेअर करत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिल्पकलेला नवी दिशा देणाऱ्या राम वांजी सुतार यांच्या हातून देशभर अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची शिल्पे साकारली. साधेपणा, नम्रता आणि कलेप्रती निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. देह जरी नश्वर असला, तरी त्यांनी घडवलेली शिल्पे आणि दिलेला कलावारसा भारताच्या इतिहासात अजरामर राहणार आहे.