– आज लातुरात अंत्यसंस्कार; अनुभवी, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न राजकारणी हरपला!
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – देशाच्या राजकारणात संयम, शुचिता आणि तत्त्वनिष्ठतेची ओळख असलेला शांत, अभ्यासू आणि तेजस्वी आवाज आज कायमचा थांबला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास लातूर येथील देवघर निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना उपचार सुरू होते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश, सून अर्चना आणि नातवंडे असा परिवार आहे.
शिवराज पाटील चाकूरकर हे शांत पण ठाम भूमिकांसाठी ओळखले जाणारे सभ्य, सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी होते. राजकारणातील शाब्दिक टोकूपेक्षा संयमाला दिलेले त्यांचे महत्त्व, तडफदार निर्णयापेक्षा विवेकपूर्ण मार्गाची निवड—या सर्व गुणांमुळे ते एक विरळ व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांच्या जाण्याने राज्य व देशाच्या राजकारणातील सभ्यतेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ढासळल्याची भावना व्यक्त होत आहे. 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूरमध्ये जन्मलेल्या पाटील चाकूरकर यांनी उच्चशिक्षणानंतर 1967–69 या काळात लातूर नगरपालिकेत काम करून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले. 1980 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून येत त्यांनी सलग सात लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि 1999 पर्यंत संसदीय क्षेत्रात प्रभाव टिकवला. दिल्लीच्या सत्ताकेंद्रात ते संयमी, अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश यांसारख्या संवेदनशील विभागांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. 1991 ते 1996 या काळात लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय संसदेचे अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि संतुलित पद्धतीने संचालन केले. 2004 च्या पराभवानंतर ते राज्यसभेतून केंद्रात पुन्हा दाखल झाले आणि 2004–08 दरम्यान गृहमंत्री म्हणून काम पाहिले. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनेक दशकांचा त्यांचा राजकीय प्रवास संयम, स्वच्छता आणि तत्त्वनिष्ठतेचा एक आदर्श ठरला. मागील काही वर्षांत त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती, तरीही त्यांची प्रतिमा आणि कार्य जनतेच्या मनात आजही जिवंत आहे. त्यांच्या निधनाने लातूरसह संपूर्ण देशातून दुःख व्यक्त केले जात आहे. आज लातूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्त्वनिष्ठ राजकारणाचा एक उज्ज्वल अध्याय आज इतिहासजमा झाला आहे.