-उटी बुद्रुक हादरले!; क्षणभराचा राग, दोन कटू शब्द आणि संपला ‘लक्ष्मी’चा श्वास!
जळगाव जामोद/बुलढाणा (सुरेश हुसे) — घरगुती वादातून पेटलेल्या रागाने एका संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले. उटी बुद्रुक (ता. जळगाव जामोद) येथे पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना शनिवारी मध्यरात्री घडली. “तु काही कामाची नाहीस… बाहेर जा आणि मरून जा!” — पत्नीने रागाच्या भरात टाकलेले शब्द पतीच्या मनात इतके खोल रुजले की, त्याने क्षणिक रागात थेट रक्तपात केला. गावात स्तब्धता पसरली असून अवघ्या सात महिन्याच्या चिमुकलीचे मातृछत्र क्षणात हिरावले.
२४ वर्षीय लक्ष्मी पवन धुंदाळे ही तरुणी या भयानक कृत्याची बळी. तर आरोपी पवन गजानन धुंदाळे (२८) हा तिचाच पती. दोघेही शेतमजुरी करून संसार चालवणारे, संघर्षाशी रोज दोन हात करणारे; पण कर्ज, ताण आणि घरातील सततच्या किरकोळ वादातून वाढत गेलेले दुराव्याचे धगधगते कोळसे अखेर मध्यरात्री भडकले. पवनने कुऱ्हाडीचे वर उगारले आणि एका तरुण आयुष्याचा शेवट केला.
गावभर चर्चा — “एक चुकीचा क्षण आणि उद्ध्वस्त दोन पिढ्या!”
हत्येनंतर आरोपीचे आई-वडील भेदरून घराबाहेर पडले आणि ग्रामपोलीस पाटील संदीप गटमने यांना घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ग्रामपोलिस पाटीलांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर कलम 302(1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पवनला अटक झाली असून ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लक्ष्मी आणि पवन यांचा संसार साधा, गरिबीशी झुंज देणारा. तरीही दोघांनी मिळून कसेबसे कुटुंब चालवले. पण एक रात्र, एक वाद आणि क्षणभरात उद्ध्वस्त झालेले भविष्य — या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. घरातील सात महिन्यांची चिमुकली आईच्या शोधात हात पसरत आहे; पण काळाने तिच्या कपाळावर अंधार पडला. गावात एकच प्रश्न घुमतोय — “या निरपराध बाळाचा काय दोष?”
ही घटना महिलांवरील घरगुती हिंसाचार, मानसिक ताण आणि तात्काळ रागाच्या विनाशकारी परिणामांचा तीव्र चेहरा दाखवून जाते. उटी बुद्रुकमध्ये आजही शांतता नाही, फक्त एक हंबरडा… आणि एका चिमुकलीच्या भवितव्याची काळी छाया.