– शेतकऱ्यांना लाभाऐवजी अन्याय; कोटेशन भरूनही विजेची प्रतीक्षा!
बुलढाणा/नागपूर (बाळू वानखेडे) – शासनाने मोठ्या दिमाखात “मागेल त्याला सौर पंप” अशी घोषणा करून शेतकऱ्यांच्या आशांना पंख दिले; मात्र प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांपासून जोडण्या थांबवून ठेवत ही योजना कागदावरच अडकवली आहे. एकीकडे ‘एकराची अट’ लावून हजारो शेतकऱ्यांना योजनेस पात्रतेबाहेर ढकलले, तर दुसरीकडे कोटेशन भरल्यानंतरही विजेची जोडणी नाकारून सरकार शेतकऱ्यांची थट्टाच करीत असल्याचा आरोप मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर केला.
शासनाने लाखमोलाचा गाजावाजा करत सुरु केलेली “मागेल त्याला सौर पंप” योजना प्रत्यक्ष लाभ देण्यात अपयशी ठरल्याचे चित्र अधिवेशनात मांडताना खरात म्हणाले की, “शासन सांगते मागेल त्याला सौर पंप, पण त्याच योजनेत एकराच्या निकषांनी शेतकऱ्यांनाच बाहेर ढकलले जाते.” योजनेनुसार २.५ एकरपर्यंत ३ एचपी, ५ एकरांपर्यंत ५ एचपी आणि त्यापुढे ७.५ एचपी पंप देण्याची तरतूद असली, तरी डोंगराळ भाग, खोल विहिरी किंवा ५०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरून पाणी आणायच्या परिस्थितीत ही क्षमता अत्यंत अपुरी पडते. परिणामी पंप बसवूनही पाणीच न ओढले जाण्याची वेळ येते आणि योजना व्यर्थ ठरते, असा खरात यांनी ठपका ठेवला. सन २०२२ पासून सौर पंप जोडण्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांचे अर्ज व कोटेशन प्रलंबित आहेत. अनेकांनी कर्ज काढून कोटेशन भरले, प्रक्रिया पूर्ण केली, मात्र आजतागायत प्रत्यक्ष विजेची जोडणी मिळालेली नाही. या परिस्थितीमुळे “योजना नावालाच” असल्याची भावना शेतकऱ्यांत वाढत चालली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारच्या चौकात!
अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना खरात म्हणाले, “अंतरावरून पाणी आणायची वेळ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा शासनाने कोणताच विचार केलेला नाही. पंपाची क्षमता अपुरी, जोडण्या बंद आणि एकराची अट—या तिन्ही गोष्टींनी योजना पूर्णपणे फसवी ठरली आहे. मागेल त्याला सौर पंप योजनेतील एकराची अट तातडीने रद्द करून, गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षेत अडकलेल्यांना तत्काळ विजेची जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात ठामपणे केली. यापूर्वीच्या अधिवेशनातही खरात यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले होते; मात्र शासनाकडून सकारात्मक निर्णय न निघाल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.