-जळगाव जामोद हादरले; टेक्निकल क्लासच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्या, त्यानंतर थेट अपहरणाचा गुन्हा दाखल!
बुलढाणा (बाळू वानखडे): टेक्निकल क्लाससाठी घरातून निघालेल्या आणि एकत्र बसस्थानकावर दिसलेल्या सुनगाव येथील तीन अल्पवयीन मैत्रिणी जळगाव जामोद बसस्थानकातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या तीन शाळकरी मुली एकाच वेळी गायब झाल्याने, ‘त्यांना कोणीतरी फुस लावून पळवून नेले की, हा काही गंभीर कट आहे,’ अशा चर्चांना उधाण आले आहे. पालकांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास चक्र गतीमान केले आहे.
बेपत्ता झालेल्या
तिन्ही मुली सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील रहिवासी असून, त्यांची नावे तेजस्विनी गजानन वसुले (वय १६), सानिका श्रीराम ताडे (वय १६) आणि चंचल श्रीकृष्ण मोहे (वय १६) अशी आहेत. या तिघीही नेहमीप्रमाणे टेक्निकल क्लाससाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या काही मैत्रिणी आणि प्रत्यक्षदर्शींनी त्यांना अखेरचे जळगाव जामोद बस स्थानकाच्या परिसरात एकत्र पाहिले होते. मात्र, त्यानंतर या तिघीही एका क्षणात जणू हवेत विरल्यासारख्या गायब झाल्या.बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची ही गंभीर घटना असून, या तिन्ही निरागस ‘कळ्यां’चा शोध घेणे, हे जळगाव जामोद पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. प्रेमप्रकरण, जबरदस्ती किंवा बाल तस्करी यापैकी नेमके कोणत्या कारणामुळे मुली बेपत्ता झाल्या, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
सीसीटीव्ही तपासणी आणि पालकांचे अश्रू!
मुली घरी परतल्या नाहीत म्हणून पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. “आमच्या मुलींना कोणीतरी जाळ्यात ओढले असावे,” अशी भीती त्यांच्या अश्रूंमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ बस स्थानकासह परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू केली आहे. मात्र, फुटेजमध्येही मुलींची पुढील हालचाल स्पष्ट होत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अल्पवयीन मुलींचा थांगपत्ता न लागल्याने आणि त्यांचा जीव धोक्यात असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.