– Gen Z चा नवा आदर्श! १९ वर्षीय देवव्रतने काशीत रचला इतिहास; वैदिक विद्येची पताका जगभर उंचवली!
अहिल्यानगर/वाराणसी (केयूर सांगळे): महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील अवघ्या १९ वर्षांच्या देवव्रत महेश रेखे या तरुणाने वेदाध्ययनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या २०० वर्षांत देशातील शंकराचार्य किंवा मठाधीश यांनाही जी गोष्ट साधता आली नाही, ते अत्यंत कठीण असलेले ‘दंडक्रम पारायण’ देवव्रतने केवळ ५० दिवसांत बिनचूकपणे पूर्ण केले आहे. त्याच्या या अलौकिक सिद्धीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.
जेन ‘झी’ (Gen Z) पिढी हिंसेकडे किंवा सोशल मीडियात आत्ममग्न होत असताना, देवव्रतने मात्र वयाच्या १९ व्या वर्षी धर्माची आणि वेदांची पताका जगभर उंचवण्याची एक नवी सुरुवात केली आहे. काशीच्या वल्लभराम शालीग्राम सांग्वेद विश्वविद्यालयात १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या ५० दिवसांच्या कालावधीत ही ‘वेदपरीक्षा’ पार पडली. दंडक्रम पारायण हा यजुर्वेद मंत्रांचा एक अत्यंत कठीण आणि प्राचीन क्रम आहे. यात वेदांमधील मंत्र विशिष्ट पद्धतीने स्वरात, उलट-सुलट क्रमाने आणि अचूक उच्चारांसह पठण करावे लागतात. प्राचीन ऋषींनी सांगितलेल्या आठ प्रकारच्या पाठांपैकी हा दंडक्रम सर्वांत कठीण मानला जातो. या दंडक्रमात शब्दांचा क्रम १-२, २-१, १-२; त्यानंतर १-२-३, ३-२-१, १-२-३; अशाप्रकारे उलटसुलट करून म्हणावा लागतो. देवव्रतने शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिनी शाखेचे २ हजार मंत्रांतील सुमारे २५ लाख श्लोक या कठीण दंडक्रमाने एकही स्वर, अक्षर किंवा उच्चार न चुकता तोंडपाठ म्हणून दाखवले. २०० वर्षांपूर्वी नाशिकमधील वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी हे पारायण १०० दिवसांत पूर्ण केले होते, देवव्रतने त्यांच्यापेक्षा निम्म्या वेळेत ही कामगिरी साध्य केली.
दीड वर्षात मिळवली सिद्धी!
सामान्यतः दंडक्रम पारायणाचे शिक्षण घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो, पण गुरुकृपेमुळे देवव्रतने दीड वर्षांतच हे शिक्षण पूर्ण केले. याविषयी बोलताना तो म्हणाला, “मी १७ वर्षांचा असल्यापासून दंडक्रम पारायण शिकण्यास सुरुवात केली. दिवसातील १२ ते १८ तास शिक्षण सुरू होते, तेव्हाच हे साध्य झाले. मी आताच्या पिढीला एवढेच सांगेन की, आपले मूळ हे वेदधर्म आहे, हे विसरू नका. अभ्यास करत राहा आणि गुरुसेवा करत राहा.” देवव्रतच्या या वेदपरीक्षेसाठी गणेश्वर शास्त्रींसह काशीचे नामवंत विद्वान आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेदशास्त्री उपस्थित होते. अहिल्यानगरच्या या तरुणाने काशीतील २०० वर्षांचा इतिहास बदलून टाकल्याबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.