– निकृष्ट धान्यवाटपावरून जिल्हा पुरवठा विभागाला जाब; कारवाई न झाल्यास २३ डिसेंबररोजी आंदोलनाचा संतोष भुतेकर यांचा इशारा!
चिखली (राजेंद्र घुबे) – जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर महिन्यात वाटप करण्यात आलेला तांदूळ आणि ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, ते धान्य किडे, भुंगे, जाळे आणि आळ्यांनी भरलेले होते. माणसांना सोडाच, पण जनावरांनाही खाण्यायोग्य नसलेले हे धान्य गोरगरिबांना खायला देऊन जिल्हा पुरवठा विभागाने त्यांची थट्टा चालवली आहे, असा गंभीर आरोप युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी केला आहे. गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा अधिकारी नेमका कोण आहे? तो शासनाचा व प्रशासनाचा जावई आहे काय, असा संतप्त सवाल विचारत त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्षभरात आणि विशेषतः नोव्हेंबर महिन्यात वाटप करण्यात आलेले हे निकृष्ट धान्य पाहून ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था पुरवठा विभागाची झाली असल्याचा आरोप युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत, की ज्यांना राशनचे धान्य खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. अशा कुटुंबांना निकृष्ट, किडलेले, भुंगे लागलेले धान्य खाण्यासाठी देऊन विभागाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चालवला आहे, हे आता उघड झाले आहे. हे धान्य पुरवणारी यंत्रणा कोणती आणि तिला पाठीशी घालणारा, खपवून घेणारा अधिकारी कोण, याचा तातडीने खुलासा करून त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका युवा सेनेने घेतली आहे.याशिवाय, युवा सेनेने आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विभागाने अनेक गोरगरीब कुटुंबांकडून धान्य नाही, तर पैसे मिळतील असे सांगून फॉर्म भरून घेतले होते. त्या लोकांना अजूनही पैसे मिळाले नाहीत किंवा धान्यसुद्धा मिळत नाही. ही कुटुंबे वारंवार पुरवठा विभागाकडे चकरा मारत असूनही, अधिकाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा. एकतर त्यांना त्वरित धान्य द्यावे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत. तसेच, नेमके घोडे कुठे अडले आहे आणि ते कधी मार्गी लागणार, याचा तरी किमान खुलासा करावा, जेणेकरून लोकांना तुमच्या दारात चकरा मारण्याचे काम पडणार नाही, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. युवा सेनेने स्पष्ट केले आहे की, वरील मुद्द्यांची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.