– वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; चिखली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
चिखली /बुलढाणा (बाळू वानखेडे/गणेश निकम): बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विशेषतः सिंचन क्षेत्रातील एक आधारस्तंभ असलेले जिल्ह्याचे ‘जलपुरुष’ माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे आज (दि. ३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारासाठी डॉ.तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतभाऊ बोंद्रे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या चिखली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
भारतभाऊ बोंद्रे हे प्रामुख्याने सिंचन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जात होते. बुलढाणा जिल्ह्याला ‘सुजलाम सुफलाम’ (पाण्याने समृद्ध) करण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मोठे प्रयत्न केले. खडकपूर्णा, पेनटाकळीसह जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. त्यांच्या याच अविश्रांत परिश्रमामुळे जिल्ह्याचा दुष्काळी प्रदेशाचा कलंक पुसला गेला आणि जिल्ह्याला पाणीदार करण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते, ज्यामुळे त्यांना जनतेकडून ‘जलपुरुष’ ही पदवी मिळाली. राजकारणात आणि समाजकारणात त्यांचा प्रवास दीर्घ आणि यशस्वी राहिला. राज्याच्या मंत्रिमंडळात (माजी मंत्री म्हणून) महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. जलप्रकल्पांव्यतिरिक्त ते शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्षरत राहिले. तळागाळातील लोकांशी त्यांची असलेली नाळ आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची तळमळ ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक योजना आणि उपक्रम राबवले, ज्यामुळे विकासाच्या नकाशावर जिल्ह्याचे नाव कोरले गेले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता जाफ्राबाद रोडवरील नानाशेठ बोंद्रे यांच्या वीटभट्टीजवळ मोठ्या जनसमुदयाच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती.
भारतभाऊ बोंद्रे यांच्या निधनाची बातमी कळताच जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय, सामाजिक वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक दूरदृष्टीचा आणि जनसामान्यांशी जोडलेला नेता गमावला आहे.
भारतभाऊ मितभाषी व्यक्तिमत्व होते. अनेक वेळा ते राज्याच्या मंत्रिमंडळात राहिले. राज्याचे शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली होती. उद्योग मंत्री हे वजनदार खाते यांनी पाहिले. पाटबंधारे मंत्री असताना त्यांचा सर्वाधिक लाभ बुलढाणा जिल्ह्यास झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेली व होत असलेली अनेक धरणे ही भारतभाऊंची देण आहे. जिल्ह्यास हिरवे स्वप्न देणारा हा माणूस जलपुरुष म्हणूनही ओळखला जातो. राजकारणी म्हणून भारत बोंद्रे यांचा प्रवास संघर्षाचा राहिला. चिखलीमध्ये पाटील आणि खेडेकर दोन परिवार राजकीयदृष्ट्या मजबूत होते. या परिवारांना शह देत चिखलीत भारतभाऊंनी आपले राजकारण मजबूत केले. चिखली आणि बोंद्रे हे समीकरण दृढ करण्यामध्ये बोंद्रे परिवारातील जे काही लोक पुढे आले, त्यामध्ये भारतभाऊ हे नाव ठळकपणे दिसून येते. 1972 मध्ये काँग्रेसचे दोन भाग झाले. काँग्रेसविरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक झाली. त्यावेळी प्रथमच भारतभाऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढले व विजयी झाले. ही निवडणूक भारत भाऊंची राज्यातील राजकारणात एन्ट्री करणारी पहिली निवडणूक ठरली. त्यानंतर त्यांनी बऱ्याच पंचवार्षिक मागे पाहिले नाही. राज्याच्या राजकारणात त्यांनी मोठा दबदबा निर्माण केला होता. जेस्ट नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून भारत बोंद्रे यांच्याकडे पाहिले गेले.
लढवय्या नेता
1972 मध्ये भारत भाऊ यांनी चिखलीत संतोषराव पाटील आणि टी बी खेडेकर या तगड्या नेत्यांना आव्हान दिले. 1972 मध्ये ते पहिल्यांदा चिखलीमध्ये आमदार झाले.1980 ला भारतभाऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून विजयी झाले. 1985 मध्ये चिखली मतदार संघातून त्यांना जनतेने पुन्हा कौल दिला.1990 मध्ये ते सलग विजयी झाले. तर 1995 साली रेखाताई खेडेकर यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि भारतभाऊ मागे पडले ते कायमचेच….अलीकडच्या काळात वयोमानानें ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते मात्र पाटबंधारे विभागाशी संबंधित कुठलेही काम असले तर जिल्ह्यासाठी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करायचे.
१९७८ ची ग्रामपंचायत सारखी अटीतटीची निवडणूक राज्यात गाजली…
1978 साली चिखली मध्ये तुल्यबळ तीन उमेदवार उभे राहिले. भारतभाऊ, केशवराव बाहेकर आणि जनार्दन बोंद्रे या तिघांमध्ये झालेली निवडणूक एखाद्या ग्रामपंचायत सारखी झाली. जनसंघांकडून केशवराव तर एकाच परिवारातील दोन बोंद्रे एकमेकांच्या विरोधात असे चित्र होते. सर्व उमेदवारांना 27 हजार सम मते मिळाले. विजयासाठी फक्त 90 मतांची वाढीव गरज होती ती जनार्दन बोंद्रे यांना मिळाली. ग्रामपंचायतीच्या वार्डासारखी झालेली ही निवडणूक त्यावेळी राज्यामध्ये प्रचंड गाजली होती.