– वडनेर–मलकापूर रोडवर २९,०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त; १२.३३ लाखांचा मोठा साठा उघड!
– गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी स्वतः ‘ऑन फिल्ड’; अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले!
बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – जिल्ह्यात अवैध बायोडिझेल साठा व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज (दि.१५) जोरदार कारवाई करत मोठा गुप्त साठा उघड केला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे स्वतः मैदानात उतरल्याचे दिसून आले व अवैध धंदेचालकांचे चांगलेच धाबे दणाणले. जिल्हाधिकार्यांनी वडनेर–मलकापूर रोडवर संशयितरित्या उभ्या असलेल्या टँकरवर छापा टाकून, तब्बल २९,०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त केले. त्याचे बाजारमूल्य १२,३३,१९४ रूपये इतके आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की वडनेर–मलकापूर रोडवर उभा असलेला टँकर क्रमांक जीजे ०३ बीडब्लू ३०३४हा पाहून पथकाला संशय आला. चालक सहदेव याने उडवाउडवीचे व अपुर्या माहितीचे उत्तरे दिल्याने टँकरची कसून तपासणी करण्यात आली. तपासात उघडकीस आले की हे अवैध बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली, अंकलेश्वर (जि. भरूच, गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथे पाठविण्यात येत होते. गोपनीय माहितीचा मागोवा घेत जिल्हा प्रशासनाच्या पथकाने ही मोठी कारवाई यशस्वीरित्या पार पडली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार राहुल तायडे व पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हा प्रशासन आणि पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्फत वेगाने सुरू आहे.
‘अवैध बायोडिझेल व्यवहार अजिबात सहन केला जाणार नाही’ – जिल्हाधिकारी
‘जिल्ह्यात अवैध बायोडिझेलचा कोणताही व्यवहार सहन केला जाणार नाही. यात गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कुठेही अवैध बायोडिझेलचे हालचाली आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अवैध वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे स्वतः रात्री-बेरात्री छापे टाकत असून, ते अचानक सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली तालुक्यात येत असल्याने महसूल प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे, तसेच वाळूतस्करांची घाबरगुंडी उडत आहे. परंतु, एकटा प्रामाणिक अधिकारी काय करू शकणार, याची अगतिकतादेखील जाणवत आहे. दिवसा दररोजचे प्रशासकीय कामकाज व रात्री वाळूतस्करांविरोधातील मोहीम यामुळे जिल्हाधिकारी यांना पुरेशी झोपही मिळत नसल्याचे त्यांच्या अधिकारीवर्गाकडून कळते आहे.