– मुंब्रातून एका संशयिताला अटक; स्फोटात वापरलेल्या कारचा विक्रेताही जेरबंद!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – दिल्लीतील बॉम्बस्फोटप्रकरणी तपास यंत्रणांनी देशभरात छापेसत्र राबविले. यादरम्यान, मुंबईतील मुंब्रा येथून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. यासह, मुंबई, पुणेसह महत्वाच्या शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था – एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसेच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये उभी होती, असे चौकशीदरम्यान समोर आले. तपास अधिकार्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या कार स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या स्फोटात वापरण्यात आलेली कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातली संशयित डॉ.शाहीन शाहीद हिचा भाऊ परवेझ अन्सारी याच्या लखनऊमधील घरावर उत्तप्रदेश एटीएसने कारवाई केली असून, तेथून मोबाईल फोन्ससह इतर यंत्रसामुग्री जप्त केली होती.
महाराष्ट्र एटीएस दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा येथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचे एटीएसने सांगितले.