– मंत्री गुलाबराव पाटलांचा रोख कुणाकडे? मेहकरात शिंदे सेनेचे जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर
– कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी नेत्यांनीही जिवाचे रान करावे – खा. शिंदे
– काळ कसोटीचा, मतभेद दूर ठेवत शिवसेनेच्या विजयासाठी एकदिलाने काम करा – ना.जाधव
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून नेता घडत असतो व पक्षही वाढत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यांना विजयी करण्यासाठीही नेत्यांनी आता जीवाचे रान करावे, असे आवाहन शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले, तर सध्याचा काळ पक्षासाठी कसोटीचा काळ आहे, याची जाण आणि भान ठेवत आपसातील मतभेद दूर ठेवत शिवसेनेच्या विजयासाठी एक दिलाने काम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. तर डॉ.संजय रायमुलकर यांचा पराभव झालाच कसा, अशी खंत व्यक्त करत जीवनात अशा घटना घडत असतात पण का पडलात याचा शोध घेण्याची गरज असून, फिक्सिंग वाले चेक करा व आपल्यातील फितूर शोधा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा राजकीय सारिपाट माहीत असलेल्या ना. गुलाबराव पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.
बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्यावतीने मेहकर येथील भूमिपुत्र प्रतापराव जाधव शेतकरी भवन येथे शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन काल, दि. ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ना.गुलाबराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सदर प्रशिक्षण शिबिराकडे मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाठ, मंत्री शंभूराजे देसाई, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार संजय गायकवाड, आमदार मनीषा कायदे, प्रवत्तäया ज्योती वाघमारे, माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकरसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकरसह मान्यवरांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रथम सकाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते व माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत पार पडले. पहिल्या सत्रात महिलांचा राजकारणात सहभाग या विषयावर आमदार मनीषा कायंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगून, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, मुलींसाठी शिक्षणाची मोफत सोय अनेक क्रांतिकारी योजना त्यांनी राबवल्याचे आमदार श्रीमंती कायंदे म्हणाल्या. तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेच्या १०० जागा लढवून २० जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ८० जागा लढवून ६० जागा जिंकल्या. त्यामुळे हे त्यांनी राबवलेल्या योजनांचे यश असून, सदर योजना घराघरात पोहोचवा, असे आवाहन प्रवत्तäया डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले. दुसर्या सत्रात विश्वनाथ केळकर यांनी लक्ष्यवेध अॅप याबाबत प्रशिक्षण दिले.
राजकारणात समाज माध्यमांचा प्रभाव या विषयावर प्रतिक शर्मा यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजीनगर येथील प्रा.राजेश सरकटे यांच्या स्वरविहारच्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाला चांगलाच साज चढवला होता. यावेळी विजय अंभोरे, जिल्हा प्रमुख संतोष डिवरे, शांताराम दाणेसह मान्यवरांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, भगवानराव सुलताने, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, निरज रायमुलकर, दिलीपराव देशमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्केसह शिवसेना, युवा सेना पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.