– लवकरच नगरपालिका निवडणुकीची घोषणा; २१ दिवसात प्रक्रिया पार पडणार!
मुंबई/बुलढाणा (राजेश लोखंडे) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय तसेच निवडणूक आयोगाच्या पातळीवर लगबग सुरू झाली असून, न्यायालयाने निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आसपास निवडणुकांचे बिगूल वाजणार असल्याचे वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून कळले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोणत्याही अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्या तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ च्याआत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्यादरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांसह सामान्य नागरिक त्यातून आतासे सावरत आहेत. त्यातच काही भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर आधी जिल्हा परिषद निवडणूक घ्यावी का, याबाबत जिल्हाधिकार्यांनी संमिश्र मते व्यक्त केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील जिल्हाधिकार्यांनी लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासारखी स्थिती नाही, असे मत नोंदविले. या पार्श्वभूमीवर नगरपालिकांची निवडणूक आधी होईल. याबाबतची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.