माजी अधिकारी प्रवीण गिते यांची जाहीर घोषणा — “लोकांसाठी आता प्रशासनाच्या पलीकडे जाऊन थेट लढा देणार!”
सिंदखेडराजा ( सुरेश हुसे) – तालुक्यातील किनगाव राजा येथे आज (दि. १ नोव्हेंबर) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी सरकारी अधिकारी प्रविण गिते यांनी आपल्या सेवेला राजीनामा देऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या धाडसी निर्णयाने स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गिते यांनी सांगितले की, “सरकारी नोकरी सोडणं हे अनेकांसाठी आश्चर्यकारक वाटू शकतं, मात्र लोकांसाठी काम करण्याचं ध्येय माझं नेहमीच स्पष्ट होतं. सेवेत असताना लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही मर्यादा होत्या. आता समाजात उतरून, लोकांमधून राहून त्यांचे प्रश्न तडीला नेण्यासाठी काम करणार आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रशासनातील अनुभव गावगाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याचा मानस आहे. जात-धर्माच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ या केंद्रबिंदूवर आधारित भूमिका घेणार आहे. आपली संस्था चालवण्यासाठी नाही, तर लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठीच समाजकारणात पाऊल टाकलं आहे.” शिवछत्रपतींच्या विचारांचा उल्लेख करत गिते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरात नाही — असं म्हणून काही साध्य होत नाही. आपणच पुढे येऊन झटायला हवं. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सांगतो की गवताचे भाले करून इथल्या लोकांनी युद्धे जिंकली आहेत. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधातच नाही, तर शेतीमातीच्या प्रश्नांसाठीही आमची झुंज कायम राहील.” “शेतकरी, कामगार, तरुण आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी कुणाशीही भिडण्याची तयारी आहे,” असा ठाम निर्धार व्यक्त करत गिते यांनी समाजात ऐक्याचं आवाहन केलं. “आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा नवा विचार गावागावांत पोहोचवू. लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे,” असं त्यांनी सांगितलं. या संवादावेळी उपस्थित नागरिक आणि पत्रकारांनी प्रविण गिते यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. “प्रशासनाचा अनुभव असलेला व्यक्ती समाजात उतरल्याने गावगाड्याला नवं बळ मिळेल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. या घोषणेनंतर किनगाव राजात नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आलं आहे. समाजकारणाच्या मैदानात उतरलेल्या प्रविण गिते यांच्या या पावलाकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.