– आगामी निवडणुकांसाठी भाजपला ठरणार अडचणीचे!
वर्धा (प्रकाश कथले) – पालकमंत्री पंकज भोयर यांच्याबाबत जिल्ह्यातील नागरिकांत नाराजी वाढत असून, भाजपला ही नाराजी आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांत भोवणार असल्याची भावना जिल्ह्यातील नागरिकांतून व्यक्त व्हायला लागली आहे. या नाराजीचे पडसाद नागरिकांतून थेट मंत्रालयात पोहोचल्याचे दिसत आहे.
पालकमंत्री भोयर यांच्या कार्यशैलीवर शहरी वागण्याची छाप आहे. त्यामुळे ते शेतकर्यांच्या फारसे संपर्कात राहात नाही. ती त्यांची जुनीच कार्यशैली आहे. पण जिल्हा परिषदेकरीता तसेच पंचायत समितीकरिताचे मतदार ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे त्यांच्यात पालकमंत्र्यांबाबतची आस्था झपाट्याने कमी व्हायला लागली आहे. सध्याच्या पालकमंत्र्यांचे अस्तित्त्व केवळ अधिकार्यांसोबतच्या बैठका, भूमिपूजनापुरतेच मर्यादीत दिसत आहे. जनसामान्यांसोबत त्यांना जिल्हाभर नाळ जुळविता आलीच नाही. याची जाण भाजपच्या ज्येष्ठांनाही व्हायला लागली आहे. याचा फायदा त्यांच्या राजकीय विरोधकांनी घ्यायला सुरुवात केली असून, या नाराजीतूनच भाजपला जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतील मतदानात बसणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.