– राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या नेत्या सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांचा समर्थकांसह भाजपात दाखल
– पवार-विखे राजकीय सामना आता ‘झेडपी’ निवडणुकीतही रंगणार!
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग राखीव झाल्यानंतर भाजपला अखेर आपला संभाव्य उमेदवार मिळाला आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या नेत्या सुनीता भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्या या पदाच्या प्रबळ दावेदार ठरल्या आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीकडे राखण्यासाठी भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. मंगळवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता अशोक भांगरे यांच्यासह सुमारे ५० समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वीच सुनीता भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली होती. त्यानंतर काल मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांचा परिवार कार्यरत होता. त्या काळात स्वतः शरद पवार यांनी अकोल्यात भेट देत, अमित व सुनीता भांगरे यांना राजकीय बळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अपेक्षित संधी न मिळाल्याने अखेर भांगरे यांनी पवारांची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. या प्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुनीता भांगरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता अशोकराव भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगणार राजकारण माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत दाखल झाले, त्यानंतर अशोकराव भांगरे कुटुंबीयांसमवेत राष्ट्रवादीसोबत गेले. यानंतर प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र मधल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अशोकराव भांगरे हेच पिचड विरोधक म्हणून राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. पण त्यांना थांबायला सांगून राष्ट्रवादीकडून उमेदवारी डॉ.किरण लहामटे यांना देण्यात आली. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.