शासकीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ; शिंदे सरकारची मोठी घोषणा
– ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास
– गोविंदा पथकांना १० लाखाचे विमा संरक्षण
– बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी एक खूशखबर असून, त्यांना आता तीन टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी याची घोषणा केली. हा महागाई भत्ता ऑगस्ट महिन्यापासूनच लागू होणार आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे राज्य सरकारने ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. परिणामी, राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्क्यांवर गेला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रमुख तीन घोषणा केल्या आहेत. त्यानुसार यंदा राज्य सरकार दहीहंडीच्यावेळी गोविंदा पथकांना विम्याचे कवच देणार आहे. १० लाखांच्या विम्याचे गोविंदांना मिळेल, त्याचा प्रीमिअम राज्य सरकार भरणार आहे. या शिवाय, वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही सुविधा जाहीर करण्यात आली आहे.