– पक्षातून हकालपट्टीची शक्यता धूसर; मुस्लीमविरोधी वक्तव्यांवरून अजितदादांनी पुन्हा फटकारले!
– उद्याच्या अहिल्यानगरातील महामोर्चात आ. संग्राम जगताप या भूमिका मांडणार?
अहिल्यानगर/पुणे (विशेष प्रतिनिधी) – दिवाळी सणाची खरेदी मुस्लीम व्यावसायिकांकडून करू नका, असे आवाहन करणारे अहिल्यानगरचे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष पातळीवर अडचणीत आले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची भूमिका पक्षप्रमुख अजित पवार यांनी घेतली असून, त्यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘अरुणकाका जगताप हयात होते, तोपर्यंत तेथे सर्व सुरळीत होते. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागले, बोलले पाहिजे. एका कार्यक्रमात जगताप यांना अशा विधानांबाबत समज दिली होती. त्यावर सुधारणा करेन, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही सुधारणा दिसत नाही,’ असेही पवार म्हणाले. दरम्यान, आमदार असल्याने संग्राम जगताप यांची पक्षातून हकालपट्टी होणार नसल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरून हाती आली आहे. सतत वादग्रस्त विधाने केल्याबद्दल यापूर्वीही अजित पवारांनी आ. जगताप यांना जाहीररीत्या फटकारलेले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या या मतानुसार, संग्राम जगताप यांची ही आक्रमक भूमिका अजितदादांची डोकेदुखी वाढवणारी आहे. आता उद्या (दि.12)शहरात महामोर्चाचे आयोजन केले आहे. महापुरूषाचा अवमान केला म्हणून हा निषेध मोर्चा आहे. अजितदादांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आ. जगताप या मोर्चात काय भाष्य करतात, याकडे आता लक्ष लागलेले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, की संग्राम जगतापांची भूमिका चुकीची आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असून, पक्षाच्या विचारधारेच्या वेगळी भूमिका मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. एकदा का पक्षाचे ध्येयधोरण ठरले तर पक्षाच्या विचारधारेपासून वेगळी भूमिका घेत कुठलाही खासदार-आमदाराने किंवा नेता असे बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. तशी आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहणार.’, असेही अजित पवार यांनी सांगून, आ. जगताप यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेत. सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना आ. संग्राम जगताप यांनी, दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आ. संग्राम जगताप यांच्या मुस्लीमविरोधी भूमिकेमुळे त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी दिसून येत असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही नाराजी पक्षप्रमुख अजित पवारांपर्यंत पोहोचवली आहे. अजित पवारांनीही आ. संग्राम जगताप यांना वेळोवेळी समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तथापि, आमदार असल्याने पक्ष त्यांना बाहेरचा रस्ता दाखविणार नाही, असेही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात येत असले तरी, पक्ष पातळीवर त्यांच्यावर कारवाई होईल, असेही सांगण्यात आले आहे.
‘आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोलले पाहिजे. हा शिव,शाहू,फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. मी त्याला याआधी समजावले आहे. त्याची जी भूमिका आहे, विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल,’
– अजित पवार, पक्षाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आ. संग्राम जगताप हे हिंदूत्ववादी नेतृत्व म्हणून पुढे आले असून, त्यांचे सासरे आ. शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आ. जगताप हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अहिल्यानगर येथे सुरू आहे. स्थानिक पातळीवर आ. जगताप यांनी भाजपला पुरक अशी भूमिका घेतलेली दिसून येत असून, पुढील विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून उमेदवार राहू शकतात, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
दरम्यान, सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्पेâ औपचारिक पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर अकोला (विदर्भ) येथील रामदासपेठ पोलिस ठाण्यात ही तक्रार प्रदेश संघटक सचिव जावेद जकारीया यांच्या नेतृत्वावात दाखल करण्यात आली आहे.