– शरद पवारांनी १९९४मध्येच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करायला हवा होता – विखे
– अंतरवली सराटीत मंत्री विखे व मनोज जरांगे पाटील यांच्या १५ मिनिटे खासगीत चर्चा!
बुलढाणा (राजेश लोखंडे) – समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशा रोखठोक शब्दांत राज्याचे जलसंपदा मंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. १९९४ साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केला असता, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही विखे पाटील म्हणाले. पवार-विखे हा राजकीय वाद राज्यात सर्वशृत आहे. बुलढाणा भेटीनंतर विखे यांनी आज (दि.९) विखे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोघांत 15 मिनिटे खासगीत चर्चा झाली, पण चर्चेचा तपशील हाती आला नाही.
बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बुलढाणा येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की ओबीसी नेत्यांच्या गैरसमजातून उद्याचे नागपुरातील आंदोलन घडत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ‘हैदराबाद गॅझेट’ची प्रक्रिया सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, अशी माझी विनंती आहे. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. हे पाप शरद पवार यांनी १९९४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना केले आहे. त्यावेळी मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट केला असता तर हा विषयच राहिला नसता. यामुळे या पापाचे धनी शरद पवार असल्याचे विखे पाटील यांनी ठासून सांगितले. यामुळे मोर्चेकर्यांनी आधी शरद पवारांना याचा जाब विचारावा, असेही ते म्हणाले. नागपूरमध्ये उद्या (दि.१०) ओबीसींचा मोर्चा असून, अध्यादेश रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. दरम्यान, बुलढाणा येथील भेटीगाठीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील आणि विखे यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र बाहेर आला नाही. मात्र अचानक विखे पाटील यांनी अंतरवाली येथे जाण्याचे कारण काय? तसेच, एकीकडे मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद उफाळलेला असताना झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे.
बुलढाणा : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी १९९४ मध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेतल्याचे ‘पाप’ पवारांचे असल्याचे म्हटले. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही, अशी ग्वाहीही दिली.… pic.twitter.com/jTnRsixUan
— LoksattaLive (@LoksattaLive) October 9, 2025
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय…!
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरदेखील निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना दररोज सकाळी बांग देण्यासाठी ठेवले आहे. ‘सामना’ हा पेपर फार जास्त लोक वाचत नाहीत. त्यामुळे ‘सामना’ काय म्हणतो याला महत्त्व नाही. सरकारने शेतकर्यांना भरीव पॅकेज दिले असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.