– अमोना येथील भरदिवसाचा थरार; तिघांवर गुन्हे दाखल, एक आरोपी जेरबंद
चिखली (रंजना मोरे) – जबरदस्तीने शेतात जनावरे घालून पिकाचे नुकसान केले हे पाहून शेतमालक शेतकर्याने शेतात घुसलेली ही जनावरे हाकलून लावल्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने शेत मालकावर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ही घटना अमोना येथे आज, दि. ८ ऑक्टोबररोजी सकाळी घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या अमोना येथील रहिवासी असलेले श्रीकृष्ण पुंजाराम पेहरे (वय ३०) यांचे भाऊ लक्ष्मण पुंजाराम पेहरे हे त्यांचे शेतामध्ये हजर असताना आरोपीने फिर्यादीच्या शेतात जनावरे चारत होता. हे पाहून लक्ष्मण पुंजाराम पेहरे यांनी शेतात आलेली जनावरे हाकलून लावली. त्याचा राग मनात ठेऊन आरोपीने फिर्यादीचा भाऊ यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज रोजी फिर्यादीचा भाऊ लक्ष्मण पुंजाराम पेहरे हा शेतातून घरी एकटा येत आहे हे बघून आरोपीनी फिर्यादीच्या भावाला रस्त्यात अडवून अगोदरच्या वादाच्या कारणावरून आरोपी याने त्याचे हातातील कुर्हाड फिर्यादीच्या भावास जीवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर मारून जखमी केले. फिर्यादीच्या भावाच्या पायावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकर्याला तात्काळ प्रथम उपचार करण्यासाठी जवंजाळ हॉस्पिटल चिखली येथे भरती करण्यात आले. याबाबत फिर्यादीने अंढेरा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली असता, या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार देढे यांनी आरोपी मनोहर जयवंता शितोळे, पृथ्वीराज मनोहर शितोळे, पार्वताबाई मनोहर शितोळे सर्व रा. अमोना यांच्याविरुद्ध कलम १०९, १२६(२),३५१ (२), ३(५), बीएनएस २०२३ नुसार गुन्हा दाखल केला, आणि लगेच ठाणेदार रुपेश शक्करगे व दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल, किशोर जाधव, सोनकांबळे यांनी चिखली येथे जखमीची रुग्णालयात जावून भेट घेत आणि लगेच एका आरोपीला जेलबंद करून तपास दुय्यम ठाणेदार जारवाल यांच्याकडे दिला आहे.